भारत सामाजिक व धार्मिक सुधारणा स्वाध्याय

भारत सामाजिक व धार्मिक सुधारणा स्वाध्याय इयत्ता बारावी इतिहास

प्रश्न. १. अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पूर्ण विधाने पुन्हा लिहा.

१. राजा राममोहन रॉय यांनी ……………….. प्रथेविरुद्ध इंग्रजी भाषेत पत्र लिहिले.

अ) जातिप्रथा

ब) बालविवाह

क) सती

ड) पडदा पद्धती

उत्तर :

राजा राममोहन रॉय यांनी सती प्रथेविरुद्ध इंग्रजी भाषेत पत्र लिहिले.

२. आर्य समाजाची स्थापना …………………. यांनी केली.

अ) स्वामी विवेकानंद

ब) महात्मा जोतीराव फुले

क) स्वामी दयानंद सरस्वती

ड) रामस्वामी नायकर

उत्तर :

आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली.

ब) पुढील संचामधील ‘ब’ गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा.

‘अ’ गट‘ब’ गट
१. ब्राह्मो समाजराजा राममोहन रॉय
२. सत्यशोधक समाजमहात्मा जोतीराव फुले
३. परमहंस सभामहर्षी विठ्ठल रामजी शिंदे
४. रामकृष्ण मिशनस्वामी विवेकानंद

उत्तर :

चुकीची जोडी : परमहंस सभा – महर्षी विठ्ठल रामजी शिंदे

दुरुस्त जोडी : परमहंस सभा – दादोबा पांडूरंग तर्खडकर

प्रश्न. २. ऐतिहासिक ठिकाण, व्यक्ती, घटना यांसंबंधीची नावे लिहा.

१. मुघल शासकाने राजा राममोहन रॉय यांना दिलेला किताब –

उत्तर :

मुघल शासकाने राजा राममोहन रॉय यांना दिलेला किताब – राजा

२. मुहम्मदन अँग्लो ओरिएन्टल कॉलेजची स्थापना करणारे –

उत्तर :

मुहम्मदन अँग्लो ओरिएन्टल कॉलेजची स्थापना करणारे – सर सय्यद अहमदखान

३. वायकोम सत्याग्रहात भाग घेणारे –

उत्तर :

वायकोम सत्याग्रहात भाग घेणारे – रामस्वामी नायकर

४. कोल्हापूर संस्थानात मोफत व सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा करणारे –

उत्तर :

कोल्हापूर संस्थानात मोफत व सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा करणारे – राजर्षी शाहु महाराज

प्रश्न. ३. टीपा लिहा.

१. प्रार्थना समाज

उत्तर :

i) डॉ. आत्माराम पांडुरंग तर्खडकर, न्यायमूर्ती म. गो. रानडे, डॉ. रा. गो. भांडारकर यांनी प्रार्थना सभेची स्थापना केली. प्रार्थना सभेने जनहिताची अनेक कामे केली.

ii) प्रार्थना सभेने मूर्तिपूजेस विरोध केला. एकेश्वरवादास प्राधान्य दिले. कर्मकांडाला विरोध करून प्रार्थनेवर भर दिला. पारमार्थिक जीवनापेक्षा ऐहिक जीवनाला अधिक महत्त्व दिले.

iii) कामगारांसाठी रात्रशाळा सुरू केल्या, स्त्री-शिक्षण संस्थांची स्थापना केली आणि स्त्री-पुरुष समानतेची चळवळ सुरू केली.

iv) समाजातील जातिभेदांना विरोध केला, अनाथालये सुरू केली.

२. सत्यशोधक समाज

उत्तर :

महात्मा जोतीराव फुले यांनी १८७३ साली पुणे येथे सत्यशोधक समाजाची स्थापना केली. सत्यशोधक समाजाने पुढील विचारसरणीचा पुरस्कार केला –

i) एकेश्वरवाद व मूर्तिपूजेला विरोध.

ii) वेद व पुराणांचे प्रामाण्य नाकारणे आणि विवेचक बुद्धीचे प्रामाण्य स्वीकारणे.

iii) पुरोहितांच्या वर्चस्वाला व मध्यस्थीला विरोध.

iv) चमत्कारांवर अविश्वास व तीर्थयात्रेला विरोध.

v) परलोक कल्पनेला विरोध.

प्रश्न. ४. खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा.

१. राजा राममोहन रॉय यांनी कोणत्या सुधारणांचा आग्रह धरला होता ?

उत्तर :

भारतातील आद्य समाजसुधारक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजा राममोहन रॉय यांनी पुढील सुधारणांचा आग्रह धरला –

i) त्यांनी सती पद्धतीला विरोध केला. प्राचीन संस्कृत ग्रंथांचा अभ्यास करून त्यांनी हे सिद्ध केले की, धर्मग्रंथांमध्ये सती जाणे हे धर्मकर्तव्य असल्याचा कोठेही उल्लेख नाही.

ii) समाजातील बालविवाह पद्धतीला त्यांनी विरोध केला.

iii) स्त्रियांबाबत असलेल्या पडदा पद्धतीला त्यांचा विरोध होता. पडदा पद्धतीमुळे स्त्रियांच्या स्वातंत्र्यावर बंधने येतात, असे त्यांचे मत होते.

iv) ईश्वराला प्रसन्न करण्यासाठी मूर्तिपूजेची गरज नाही, असे रॉय यांचे मत होते; म्हणून त्यांनी मूर्तिपुजेस विरोध केला.

v) ईश्वर एकच आहे, हा विचार त्यांनी मांडला. अनेकेश्वर वादाला त्यांचा विरोध होता.

vi) सर्व धर्मांतील समान तत्त्वे शोधणाऱ्या ाआणि समाजातील अंधश्रद्धांवर आघात करणाऱ्या राजा राममोहन रॉय यांनी समाजसुधारणेचा सतत आग्रह धरला. आपल्या लेखनातून त्यांनी आधुनिक विचारांची पायाभरणी केली.

२. रामकृष्ण मिशनने केलेले कार्य लिहा.

उत्तर :

स्वामी विवेकानंदांनी इसवी सन १८९७ मध्ये ‘रामकृष्ण मिशन’ या संस्थेची स्थापना केली. लोकसेवेला प्राधान्य देऊन रामकृष्ण मिशनने पुढील कार्य केले –

i) दुष्काळग्रस्तांना मदत केली.

ii) आजारी लोकांना औषधोपचाराची सुविधा दिली.

iii) समाजातील दीनदुबळ्यांची सेवा केली.

iv) स्त्री-शिक्षणाचा पुरस्कार करून स्त्री-शिक्षणाच्या सुविधा निर्माण केल्या. स्त्री-शिक्षणाचा आग्रह धरला.

v) आध्यात्मिक उन्नतीला देऊन समाजाला आत्मोन्नतीचा मार्ग दाखवला.

vi) ‘उठा, जागे व्हा ाआणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका’ हा संदेश विवेकानंदांनी रामकृष्ण मिशन द्वारे तरुणांना दिला.

अशा रितीने आत्मिक उन्नती, स्त्री-शिखण, दीन-दुबळ्यांचा उद्धार अशा विविध प्रकारच्या कामांतून रामकृष्ण मिशनने समाजोपयोगी कामे केली.

३. सर सय्यद अहमदखान यांनी केलेले कार्य लिहा.

उत्तर :

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात भारतात समाजप्रबोधन चालू होते. अनेक समाजसुधारक सामाजिक-धार्मिक सुधारणा करण्याचे कार्य करीत होते. मुस्लीम समाजातील सर सय्यद अहमदखान यांनी सामाजिक सुधारणेचे पुढील कार्य केले –

i) त्यांनी १८६४ मध्ये मुस्लिमांसाठी ‘सायंटिफिक सोसायटी’ स्थापन केली.

ii) या संस्थेमार्फत इतिहास, विज्ञान व राजकीय अर्थशास्त्र या विषयांचा अभ्यास केला जात असे. त्यांनी मुस्लीम समाजाला या विषयांची ओळख करून दिली.

iii) १८७५ मध्ये अहमदखान यांनी ‘मुहम्मदन अँग्लो ओरिएन्टल कॉलेज’ ची स्थापना केली. पुढे या कॉलेजचे रूपांतर ‘अलिगढ मुस्लीम युनिव्हर्सिटी’ मध्ये होते. या शैक्षणिक संस्थेमुळे मुस्लिमांमध्ये शिक्षणाची ओढ लागली. मुस्लीम मुले-मुली उच्च शिक्षण घेऊ लागली.

iv) अहमदखान यांनी ‘मोहम्मदन सोशल रिफॉर्मर’ या नावाचे नियतकालिक काढून त्याद्वारे आधुनिक विचार मुस्लीम समाजात रुजवले.

v) अहमदखान यांनी आपल्या ग्रंथातून, नियतकालिकातून ाआणि शैक्षणिक संस्थांतून आधुनिक शिक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा पुरस्कार केला.

vi) अबुल फैज याने सम्राट अकबराच्या प्रशासन पद्धतीवर लिहिलेल्या ‘आइन-ए-अकबरी’ या ग्रंथाचे त्यांनी संपादन केले.

४. रामस्वामी नायकर यांनी केलेल्या कार्याची माहिती लिहा.

उत्तर :

प्रभावी वक्ते, लेखक आणि गांधीवादी विचारसरणीचे असणारे रामस्वामी नायकर यांनी समाजसेवेचे पुढील कार्य केले –

i) महात्मा गांधींचा स्वदेशीचा विचार समाजात रुजवला.

ii) सर्व जातींना मंदिर-प्रवेश असावा, यासाठी प्रयत्न केले.

iii) अस्पृश्यांवरील निर्बंध दूर करण्यासाठी त्रावणकोरमध्ये झालेल्या ‘वायकोम सत्याग्रहा’त भाग घेतला.

iv) तमिळनाडूमध्ये त्यांनी स्वाभिमान आंदोलन सुरू केले.

v) समाजातील वर्णव्यवस्था, बालविवाह या प्रथांच्या विरोधात लढा उभारला.

vi) स्त्रियांचे हक्क, संततिनियमन या विषयांवर आपले क्रांतिकारक विचार मांडून समाजाला सुधारण्याचा प्रयत्न केला.

आपल्या समयोपयोगी कार्यांमुळे रामस्वामी नायकर यांना लोक ‘पेरियार’ म्हणजे महान आत्मा म्हणून ओळखू लागले.

Leave a Comment