लोकसंख्या भाग 2 स्वाध्याय इयत्ता बारावी भूगोल
प्रश्न. १. अचूक सहसंबंध ओळखा.
१) A : अवलंबित्वाच्या प्रमाणात वाढ झाल्याने अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो.
R : लोकसंख्येत वृद्धांची संख्या वाढल्यास वैद्यकीय खर्च वाढतात.
अ) केवळ A बरोबर आहे.
आ) केवळ R बरोबर आहे.
इ) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
ई) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत, परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
उत्तर :
इ) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
२) A : लोकसंख्येच्या मनोऱ्यात रुंद तळ बालकांची संख्या अधिक असल्याचे दाखवतो.
B : लोकसंख्या मनोऱ्याचे रुंद शीर्ष वृद्धांची संख्या अधिक असल्याचे द्योतक आहे.
अ) केवळ A बरोबर आहे.
आ) केवळ R बरोबर आहे.
इ) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
ई) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत, परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
उत्तर :
ई) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत, परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
प्रश्न. २. टिपा लिहा.
१) लोकसंख्या वाढ व स्थलांतर
उत्तर :
लोकसंख्येतील वाढ मुख्यत्वे नैसर्गिक कारणांतून घडून येते. एखाद्या भागात जन्मदराचे प्रमाण मृत्युदरापेक्षा अधिक असेल, तर तेथील लोकसंख्या नैसर्गिकरीत्या वाढते. परंतु केवळ नैसर्गिक वाढ हाच लोकसंख्या वाढीचा एकमेव आधार नसतो; स्थलांतर हा घटकही यात तितकाच महत्त्वाचा ठरतो.
स्थलांतरामागे अनेक कारणे असतात – प्राकृतिक, सामाजिक तसेच राजकीय. परंतु या सर्व कारणांहून अधिक प्रभावी ठरते ती स्थलांतर करणाऱ्या व्यक्तींची प्रेरणा. अनुकूल हवामान, चांगल्या नोकऱ्या व रोजगाराच्या संधी, दर्जेदार जीवनमान, शहरी जीवनाचे आकर्षण अशा बाबी लोकांना एखाद्या ठिकाणाकडे खेचतात – याला आकर्षण स्थलांतर म्हणतात. याउलट, नैसर्गिक आपत्ती, युद्ध किंवा युद्धसदृश परिस्थिती, राजकीय अस्थिरता व संघर्ष, जातीय किंवा सामाजिक दंगली, कारखाने बंद पडणे, नैसर्गिक साधनसंपत्तीची कमतरता, दुष्काळ अशा प्रतिकूल परिस्थितीमुळे लोक मूळ ठिकाण सोडतात – यास अपकर्षण स्थलांतर म्हणतात.
स्थलांतराच्या प्रक्रियेत दोन प्रदेश गुंतलेले असतात – एक म्हणजे जिथून लोक स्थलांतर करतात तो प्रदेश, आणि दुसरा म्हणजे जिथे ते स्थायिक होतात तो प्रदेश. ज्या प्रदेशात स्थलांतरितांचा ओघ येतो, तेथील लोकसंख्येत लक्षणीय वाढ नोंदवली जाते. मोठी महानगरे व विकसित राष्ट्रे ही याची ठळक उदाहरणे आहेत – अशा ठिकाणी स्थलांतरामुळेच लोकसंख्या झपाट्याने वाढताना दिसते.
२) लोकसंख्या मनोरा व लिंग-गुणोत्तर
उत्तर :
कोणत्याही मानवी समूहात विविध वयोगटांतील व्यक्ती आढळतात – नवजात बालक, शिशू, बालवयीन, किशोरवयीन, तरुण, प्रौढ, वृद्ध आणि अतिवृद्ध. मात्र हे वर्गीकरण खूपच स्थूल स्वरूपाचे असते. शास्त्रीय अभ्यासासाठी वयोगटांची अधिक नेमकी विभागणी केली जाते – ०-५, ५-१०, १०-१५, १५-२०, २०-२५ अशा पद्धतीने, आणि ही विभागणी शंभर वर्षांपर्यंत चालू ठेवली जाते. या प्रत्येक वयोगटातील व्यक्तींची संख्या आलेखाच्या स्वरूपात मांडली असता जो नकाशा तयार होतो, त्यास लोकसंख्या मनोरा असे संबोधले जाते.
हा मनोरा तयार करताना प्रत्येक वयोगटात स्त्री व पुरुष यांचे स्वतंत्र प्रमाण दाखवले जाते, त्यामुळे त्याला वय-लिंग मनोरा असेही म्हटले जाते. यातून एकाच वेळी दोन बाबी स्पष्ट होतात – लोकसंख्येची वयरचना आणि लिंग गुणोत्तर.
लोकसंख्या मनोऱ्याचे स्वरूपानुसार तीन प्रमुख प्रकार पडतात – विस्तारणारा, संकोचणारा आणि स्थिरावलेला. विस्तारणाऱ्या मनोऱ्यात साधारणपणे ० ते १५ वयोगटातील लोकसंख्येचे प्रमाण अधिक असते, परंतु या गटातही पुरुषांची संख्या स्त्रियांपेक्षा जास्त असल्याचे दिसून येते. यावरून असा निष्कर्ष निघतो की, एकतर स्त्री जन्मदर कमी असतो किंवा या वयोगटातील मुलींच्या जगण्याचे प्रमाण घटलेले असते. याचा पुढील परिणाम कार्यशील वयोगटावरही (साधारण १५ ते ५९ वर्षे) होतो, जिथेही स्त्रियांचे प्रमाण तुलनेने कमीच आढळते.
याउलट, स्थिरावलेल्या वयोगटरचनेत जवळपास सर्वच वयोगटांत स्त्री-पुरुष प्रमाण जवळपास समान दिसते. अशा प्रकारची रचना बहुधा विकसित देशांमध्ये आढळते. यावरून हे स्पष्ट होते की, देशाची आर्थिक व सामाजिक प्रगती आणि स्थिर लिंग-रचना यांच्यात घनिष्ठ संबंध आहे.
३) लोकसंख्येची व्यावसायिक संरचना
उत्तर :
लोकसंख्येच्या व्यावसायिक संरचनेचा अभ्यास करताना केवळ १५ ते ५९ या वयोगटातील कार्यशील लोकसंख्येचाच विचार केला जातो. या कार्यशील लोकसंख्येचे विविध व्यवसायांनुसार होणारे वर्गीकरण म्हणजेच लोकसंख्येची व्यावसायिक संरचना होय. या कार्यशील गटातील व्यक्ती प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक आणि चतुर्थक अशा चार प्रकारच्या व्यवसायांमध्ये विभागलेल्या असतात. या विविध व्यवसायगटांतील लोकसंख्येची टक्केवारी आणि त्या प्रदेशाची आर्थिक-सामाजिक स्थिती यांच्यात स्पष्ट परस्परसंबंध दिसून येतो.
ज्या प्रदेशात प्राथमिक व्यवसायात गुंतलेल्या लोकांचे प्रमाण अधिक असते, तो प्रदेश साधारणपणे विकसनशील गटात मोडतो, आणि अशा अर्थव्यवस्थेला कृषिप्रधान अर्थव्यवस्था म्हटले जाते. याचे कारण असे की, प्राथमिक व्यवसायातील लोकसंख्येचे प्रमाण जास्त असल्यास साहजिकच द्वितीयक, तृतीयक व चतुर्थक व्यवसायांतील प्रमाण कमी राहते. परिणामी अशा प्रदेशात पायाभूत सुविधा, औद्योगिक विकास आणि कुशल मनुष्यबळावर आधारित व्यवसाय हे तुलनेने अविकसित स्वरूपात राहतात.
याउलट, जसजशी लोकांची कार्यक्षमता व कौशल्यपातळी उंचावत जाते, तसतसे प्राथमिक व्यवसायातील लोकसंख्येचे प्रमाण घटत जाते, तर द्वितीयक, तृतीयक व चतुर्थक व्यवसायांतील सहभाग वाढत जातो. या टप्प्यावर शिक्षणाच्या सुविधांचा विस्तार होतो, तंत्रज्ञानाच्या साहाय्याने विविध उद्योगधंदे उभे राहतात आणि नवीन साधनसंपत्ती निर्माण होते. पायाभूत सुविधांची उभारणी होते, आणि तांत्रिक प्रगतीमुळे प्राथमिक क्षेत्रात कमी मनुष्यबळ असूनही ते क्षेत्र कार्यक्षमतेने चालू राहते. अशा अर्थव्यवस्थेला उद्योगप्रधान अर्थव्यवस्था म्हणतात, जी आर्थिकदृष्ट्या प्रगत मानली जाते.
४) साक्षरतेचे प्रमाण
उत्तर :
लोकसंख्येच्या अभ्यासात साक्षरता हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक मानला जातो. साक्षरतेचे प्रमाण हे केवळ शिक्षणाचे नव्हे, तर त्या प्रदेशाच्या एकूण आर्थिक व सामाजिक प्रगतीचेही एक निदर्शक मानले जाते. साक्षरतेची निश्चित व्याख्या मात्र प्रत्येक देशानुसार भिन्न असते. भारतात साक्षरता मोजताना ७ वर्षांवरील वयोगट प्रमाण मानला जातो – या वयोगटातील ज्या व्यक्तीला किमान एखादी भाषा वाचता-लिहिता येते आणि दैनंदिन व्यवहारासाठी लागणारी साधी अंकगणिती कौशल्ये अवगत असतात, तिला साक्षर समजले जाते. काही देशांत मात्र किमान वयोमर्यादा १५ वर्षे धरली जाते, तर काही प्रगत देशांमध्ये साक्षरतेचे वेगवेगळे स्तर किंवा श्रेणीही निश्चित केलेल्या आढळतात.
साक्षरतेचा संबंध केवळ शिक्षणापुरता मर्यादित नसून तो लोकांच्या राहणीमानाशी तसेच समाजातील स्त्रियांच्या स्थानाशीही जोडलेला दिसतो. वास्तविक पाहता साक्षरता व देशाचा विकास हे एकमेकांना पूरक असून त्यांच्यात परस्पर कार्यकारणभाव आढळतो – साक्षरतेचे प्रमाण जितके अधिक, तितकी देश प्रगत होण्याची शक्यता वाढते; आणि देश जितका अधिक विकसित, तितके साक्षरतेचे प्रमाणही उंचावते. म्हणजेच साक्षरता ही विकासाचे कारणही आहे आणि परिणामही.
जेव्हा साक्षरतेचे प्रमाण उंचावते, तेव्हा कार्यशील लोकसंख्येचा दर्जाही सुधारतो. अशी सुशिक्षित लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर द्वितीयक, तृतीयक व चतुर्थक व्यवसायांकडे वळते, ज्यामुळे नवीन साधनसंपत्तीची निर्मिती होते आणि देशाची आर्थिक भरभराट होते. परिणामी लोकांचे राहणीमान उंचावते, वाहतूक व्यवस्था, उद्योगधंदे, शैक्षणिक संस्था आणि आरोग्यसेवा यांचाही विस्तार होतो. या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे देशाची आर्थिक प्रगती अधिक वेगाने होते, आणि या प्रगतीमुळे शासनही शिक्षणविषयक धोरणांत सुधारणा करते – अधिकाधिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात, शिक्षणाला प्राधान्य दिले जाते आणि लोकसंख्या अधिकाधिक कुशल व कार्यक्षम बनवण्यासाठी विशेष उपाययोजना राबवल्या जातात. यामुळेच साक्षरता आणि आर्थिक विकास हे एकमेकांना परस्परपूरक घटक आहेत, असे ठामपणे म्हणता येते.
प्रश्न. ३. भौगोलिक कारणे लिहा.
१) विकसित राष्ट्रांमध्ये शेती व्यवसायात गुंतलेल्या लोकांची संख्या कमी आहे.
उत्तर :
विकसित देशांमध्ये कार्यशील लोकसंख्येपैकी सर्वाधिक लोकसंख्या ही द्वितीयक, तृतीयक आणि चतुर्थक व्यवसायांत आढळते. देशाचा आर्थिक विकास झाला असल्यामुळे तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर, औद्योगिकीकरण आणि नागरीकरण यांमुळे या व्यवसायात रोजगाराच्या अधिक संधी असतात. त्याच वेळेस आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीसारख्या प्राथमिक व्यवसायात कमी लोकसंख्येच्या जोरावरही शेती व्यवसाय उत्तम प्रकारे केला जातो आणि भरपूर उत्पन्न मिळवले जाते. या सर्व कारणांमुळे विकसित राष्ट्रांमध्ये शेती व्यवसायात गुंतलेल्या लोकांची संख्या कमी आहे.
२) लोकसंख्येतील साक्षरतेचे प्रमाण हे देशाच्या आर्थिक व सामाजिक विकासाचे द्योतक असते.
उत्तर :
साक्षरतेचे प्रमाण वाढत जाते, तसा लोकांच्या राहणीमानाचा दर्जा सुधारतो. स्त्रियांनाही समाजात चांगला दर्जा प्राप्त होतो. साक्षरतेमुळे मनुष्याची कार्यकुशलता वाढते आणि त्यामुळे प्राथमिक व्यवसायाव्यतिरिक्त त्याला द्वितीयक व तृतीयक व्यवसायांतील संधीही मिळू शकतात. साक्षरतेच्या प्रमाणाचा व्यक्तीच्या आर्थिक प्रगतीशीही थेट संबंध आहे आणि याचप्रमाणे देशाच्या आर्थिक विकासाचा लोकांच्या साक्षरतेशीही थेट संबंध आहे, साक्षरता जेवढी जास्त तेवढी देशाच्या विकासाची शक्यता जास्त आणि त्याचप्रमाणे देशाच्या विकासाचे प्रमाण जेवढे जास्त असते. त्याचप्रमाणे शैक्षणिक सुविधांची उपलब्धता आणि शासकीय धोरण यांचाही प्रभाव साक्षरता ही देशाच्या आर्थिक विकासाचे कारण व परिणाम असे दोन्ही घटक आहेत असे म्हणता येईल.
३) जेव्हा कार्यशील लोकसंख्येत वाढ होते तेव्हा लोकसंख्या लाभांशातही वाढ होते.
उत्तर :
एखाद्या देशातील कार्यशील लोकसंख्येच्या प्रमाणाचा संबंध प्रामुख्याने देशातील जन्म मृत्युदर या घटकाशी निगडित आहे आणि हाच घटक वय लिंग मनोऱ्यातून स्पष्टपणे दिसून येतो. जेव्हा जन्मदर खूप जास्त असतो, तेव्हा ० ते १५ या वयोगटातील अवलंबित लोकांची संख्या जास्त असते. मात्र, जसजसा लोकसंख्येचा वृद्धिदर कमी होत जातो, तसे ० ते १५ वयोगटातील लोकांची संख्या कमी होत जाते, मात्र तेव्हाच १५ ते ५९ या कार्यशील गटातील लोकसंख्येचे प्रमाण वाढत जाते. जसजसे कार्यशील लोकसंख्येचे प्रमाण वाढत जाते, तसतसा देशावरील आर्थिक भारही कमी होतो आणि तेव्हाच ही उपलब्ध कार्यशील लोकसंख्या विविध व्यवसायात कार्यरत होते. त्यामुळे एकूणच आर्थिक वृद्धी होऊन संपत्तीची निर्मिती होते. याचा थेट परिणाम आर्थिक विकासावर होतो आणि या आर्थिक विकासाचे लाभ देशातील लोकसंख्येला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष स्वरूपात मिळतात. लोकांचे उत्पन्न वाढते, राहणीमान सुधारते. वाहतूक, शिक्षण, आरोग्य यांसारख्या सेवा-सुविधात वाढ होते. एका आर्थिक कार्यशील लोकसंख्येचे प्रमाण वाढल्यामुळे मिळणारा लाभ आवश्यक असतो. म्हणूनच कार्यशील लोकसंख्येत वाढ होते, तेव्हाच लोकसंख्या लाभांशही वाढतो असे म्हटले जाते.
४) स्थलांतर हे नेहमीच कायमस्वरूपी असते असे नाही.
उत्तर :
एखाद्या ठरावीक ठिकाणी कायम वस्ती करून राहणे हा सध्या मानवाचा स्थायीभाव झाला आहे. त्यामुळे स्थलांतर हा घटकच मुळात कुठल्यातरी कारणामुळे व्यक्तीस एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यास भाग पाडते. कारण काही वेळेस आकर्षणही असते, रोजगाराची संधी, उत्तम राहणीमान, आल्हाददायक हवामान यांसारख्या काही आकर्षक कारणांमुळे व्यक्ती स्वत:हून स्थलांतरित होते. त्यामुळे असे स्थलांतर बहुतांशी कायमस्वरूपी असते. मात्र, आकर्षणापेक्षाही अपकर्षक कारणामुळे होणारे स्थलांतर व्यक्तीच्या इच्छेविरुद्ध असते. नैसर्गिक आपत्ती, सामाजिक संघर्ष किंवा कलह, देशाच्या किंवा प्रदेशाच्या फाळणीसारखी राजकीय कारणे अशा अपकर्षणांमुळे जेव्हा स्थलांतर होते, तेव्हा असे स्थलांतर हे कायमस्वरूपी असते असे नाही. त्यामुळेच प्रत्येक स्थलांतर हे नेहमीच कायमस्वरूपी असत नाही.
प्रश्न. ४. फरक स्पष्ट करा.
१) देणारा प्रदेश आणि घेणारा प्रदेश
उत्तर :
| देणारा प्रदेश | घेणारा प्रदेश |
|---|---|
| i) ज्या प्रदेशातून लोक स्थलांतरित होतात, त्या मूळ प्रदेशाला देणारा प्रदेश म्हणतात. | i) मूळ प्रदेशातून लोक ज्या प्रदेशात स्थलांतरित होतात, अशा प्रदेशाला घेणारा प्रदेश म्हणतात. |
| ii) स्थलांतरामुळे देणाऱ्या प्रदेशातील लोकसंख्येची रचना आणि गुणवैशिष्ट्ये बदलतात. | ii) स्थलांतरामुळे घेणाऱ्या प्रदेशातील लोकसंख्येची रचना आणि गुणवैशिष्ट्ये बदलतात. |
| iii) स्थलांतरामुळे देणाऱ्या प्रदेशातील लोकसंख्या कमी होतो, तसेच तेथील लोकसंख्येची घनताही कमी होते. | iii) स्थलांतरामुळे घेणाऱ्या प्रदेशातील लोकसंख्या जास्त होते, तेथील लोकसंख्येची घनताही वाढते. |
| iv) स्थलांतरामुळे देणाऱ्या प्रदेशातील वय रचना बदलते; बहुतांशी वेळेस लिंग गुणोत्तर बदलते आणि दर हजार पुरुषांमागे स्त्रियांचे प्रमाण वाढते. | iv) स्थलांतरामुळे घेणाऱ्या प्रदेशातील कार्यशील लोकसंख्येचे प्रमाण वाढते; लिंग गुणोत्तर बदलते आणि दर हजार पुरुषांमागे स्त्रियांची संख्या कमी आढळते. |
| v) देणाऱ्या प्रदेशातील लोकसंख्या कमी झाल्यामुळे काही वेळेस शेती उद्योगासारख्या स्थानिक आर्थिक व्यवसायांना मजुरांचा तुटवडा पडतो. | v) घेणाऱ्या प्रदेशात लोकसंख्या जास्त झाल्यामुळे बेकारी वाढते, काही वेळेस मजुरांचे किंवा स्थलांतरित लोकांचे शोषण होते. |
| vi) काही निवडक प्रदेशांत स्थलांतरित झालेल्या लोकांच्या मनिऑर्डरवर देणाऱ्या प्रदेशांचा काही प्रमाणात विकास होताना दिसतो. | vi) घेणाऱ्या प्रदेशात घरांचा तुटवडा, झोपडपट्टी, गुन्हेगारी, वाहतूक कोंडी, प्रदूषण अशा समस्या उद्भवतात. |
२) विस्तारणारा मनोरा आणि संकोचणारा मनोरा
उत्तर :
| विस्तारणारा मनोरा | संकोचणारा मनोरा |
|---|---|
| i) या मनोऱ्याचा तळ खूप विस्तारलेला असतो आणि शीर्षाकडे मनोरा निमुळता होत जातो. | i) या मनोऱ्याचा तळ संकुचित असतो, मात्र शीर्षाकडे या मनोऱ्याचा विस्तार वाढत जातो. |
| ii) यावरून जन्मदर जास्त आणि वाढत्या वयानुसार मृत्युदर वाढता ही दोन वैशिष्ट्ये दिसून येतात. | ii) यावरून जन्मदर कमी असतो, मात्र मृत्युदरातही लक्षणीय घट दिसून येते. |
| iii) त्यामुळेच जन्मदर जास्त असल्यामुळे अवलंबित लोकांची संख्या जास्त असते. | iii) त्यामुळेच जन्मदर कमी असल्यामुळे अवलंबित लोकांची संख्याही कमी दिसते. |
| iv) मात्र, जन्मदर जास्त असल्यामुळे वृद्धांची संख्या कमी असते. | iv) मात्र, मृत्युदर घटत असल्यामुळे वृद्धांची संख्या जास्त दिसून येते. |
प्रश्न. ५. सविस्तर उत्तरे लिहा.
१) लोकसंख्या मनोऱ्याचे लोकसंख्या अभ्यासातील महत्त्व स्पष्ट करा.
उत्तर :
लोकसंख्येचा अभ्यास करण्याचे विविध घटक आहेत आणि या घटकांपैकी लोकसंख्येचे वय आणि लिंग रचनेप्रमाणे वर्गीकरण करून केलेला अभ्यास अनेक महत्त्वपूर्ण बाबींवर प्रकाश टाकतो.
मानवी लोकसंख्येत विविध वयोगट असतात. ज्यामध्ये नवजात अर्भक, शिशू, बालक, कुमार, युवक, प्रौढ, वृद्ध आणि अतिवृद्ध लोकांचा समावेश होतो. अर्थात, हे वयोगट अगदी ढोबळ आहेत. अभ्यासाच्या दृष्टीने लोकसंख्येचा अभ्यास करताना हे वयोगट एका विशिष्ट पद्धतीने पाडले जातात. रचना ही सर्वसाधारणत: ०-५, ५-१०, १०-१५, १५-२०, २०-२५ अशाप्रकारे १०० वर्षांपर्यंत विविध गटांमध्ये केली जाते. प्रत्येक वयोगटातील लोकांची संख्या जर एका आलेखाद्वारे व्यक्त केली, तर जी रचना प्राप्त होते त्याला ‘लोकसंख्येचा मनोरा’ म्हणतात.
प्रत्येक वयोगटात त्यापुढे पुरुष आणि स्त्रिया असे वर्गीकरण करून जेव्हा असा मनोरा तयार केला जातो, तेव्हा त्याला ‘लोकसंख्येचा वय लिंग मनोरा’ म्हणतात. त्यामुळे प्रत्येक वयोगटातील पुरुषांचे आणि स्त्रियांचे प्रमाण संख्या किंवा टक्केवारी या स्वरूपात कळते.
लोकसंख्येच्या वय-लिंग मनोऱ्याच्या आधारे एखाद्या देशाचे किंवा प्रदेशाचे लोकसंख्येचे जन्मदर व मृत्युदर आणि इतर वैशिष्ट्ये समजतात. लिंग मनोऱ्याचे साधरणत : तीन प्रकार आढळून येतात :
i) विस्तारणारा वय-लिंग मनोरा
ii) संकोचणारा वय-लिंग मनोरा
iii) स्थिरावलेला किंवा संतुलित वय-लिंग मनोरा
विस्तारलेला मनोरा जास्त जन्मदर आणि जास्त मृत्युदर दर्शवतो. त्यामुळे एकीकडे १० ते १५ या वयोगटातील अवलंबित लोकसंख्येची टक्केवारी जास्त असल्याचे या मनोऱ्यावरून कळते. मात्र, त्याचे वेळेस ६० व त्यावरील अधिक वयाच्या वृद्ध व्यक्तींचे प्रमाण कमी असल्यामुळे त्या प्रदेशाचा मृत्युदर जास्त असल्याचेही समजते. थोडक्यात, हा मनोरा एखाद्या विकसनशील देशाचा लोकसंख्यावय-लिंग मनोरा असल्याचे सहज समजून येते.
याउलट, स्थिरावलेला किंवा संतुलित वय-लिंग मनोरा हा कमी जन्मदर तसेच कमी मृत्युदर ही दोन वैशिष्ट्ये ठळकपणे दर्शवतो. प्रत्येक वयोगटात पुरुष ाआणि स्त्रियांच्या संख्येत एक समानता आढळते आणि त्याच वेळेस जन्मदर कमी म्हणून ० ते १५ वयोगटातील अवलंबित लोकसंख्येची संख्या कमी मृत्युदरही कमी त्यामुळे ६० व त्यावरील अधिक वयाच्या लोकांच्या संख्येचे प्रमाण जास्त ही दोन ठळक वैशिष्ट्ये दिसतात. त्याच वेळेस १५ ते ५९ या वयोगटातील कार्यशील लोकसंख्येचे प्रमाण ह्या देशात जास्त असल्याचे दिसते. एकंदरीत कमी मृत्युदर म्हणजे उत्तम वैद्यकीय सेवा-सुविधा, पायाभूत सुविधांचा विकास, उत्तम राहणीमान या गोष्टी दिसून येतात. कमी जन्मदर म्हणजे शिक्षण आणि शैक्षणिक प्रगती दर्शवते आणि त्याच वेळेस कार्यशील लोकसंख्येचे चांगले प्रमाण हे आर्थिक विकासाचा दर्जा दर्शवते.
२) लोकसंख्येची ग्रामीण व शहरी रचना स्पष्ट करा.
उत्तर ;
लोकसंख्येच्या अभ्यासात लोकसंख्येचे विविध घटक अभ्यासले जातात. लोकसंख्येच्या विविध घटकात लोकसंख्येचे वितरण, लोकसंख्येची घनता, साक्षरता वयरचनेनुसार लोकसंख्येचे वितरण आणि वर्गीकरण, लिंग रचनेनुसार लोकसंख्येचे वर्गीकरण, स्थलांतराची कारणे आणि स्थलांतराचा उद्देश. अशा विविध प्रकारे लोकसंख्येचा अभ्यास केला जातो.
अशाच प्रकारे लोकसंख्येचा अभ्यास हा लोकांच्या वास्तव्याच्या ठिकाणावरूनही केला जातो. लोकसंख्या वास्तव्याच्या ठिकाणावरून लोकसंख्येचे ग्रामीण लोकसंख्या आणि शहरी लोकसंख्या असे वर्गीकरण करता येते.
ग्रामीण आणि शहरी वसाहतीतील लोकसंख्येची काही विशेष वैशिष्ट्ये दिसून येतात.
लोकसंख्येचे राहणीमान, त्यांच्या व्यवसायाचे स्वरूप, सामाजिक रचना, वय रचना, लिंग गुणोत्तर, लोकसंख्येचे वितरण, लोकसंख्येच्या घनतेचे वितरण आणि विकासाचा स्तर या सर्व वैशिष्ट्यांबाबत ग्रामीण आणि शहरी लोकसंख्येत लक्षणीय फरक दिसून येतो.
सर्वसाधारणत: ग्रामीण लोकसंख्या ही प्रामुख्याने प्राथमिक व्यवसायात गुंतलेली दिसते. येथे लोकसंख्येची एकूण घनता ही कमी असते. त्याच प्रमाणे आर्थिक विकासाचा स्तरही कमी असल्यामुळे पायाभूत सेवा-सुविधा, वैद्यकीय सेवा-सुविधा, शिक्षणाच्या सेवा-सुविधा या शहरी भागाच्या तुलनेत कमी विकसित असतात. बहुतांशी स्थलांतरितांच्या प्रकरणात ग्रामीण भाग हा स्थलांतरित देणारा प्रदेश असतो आणि ग्रामीण भागातून शहरी भागाकडे, विकसित भागाकडे स्थलांतर होत असते. याचा परिणाम ग्रामीण भागातील वय रचना आणि लिंग गणोत्तरावर होताना दिसतो. अनेक वेळेस शेती स्थानिक ग्रामीण उद्योगांना कार्यकुशल मजुरांची कमरतताही भासते.
या तुलनेत शहरी लोकसंख्या ही प्रामुख्याने द्वितीयक व तृतीयक व्यवसायांत कार्यरत असते. शहरी भाग हा स्थलांतरित घेणारा प्रदेश असतो. साहजिकच येथे लोकसंख्या आणि लोकसंख्येची घनता या दोन्ही बाबी जास्त असतात. स्थलांतरितांमध्ये प्रामुख्याने कार्यशील अशा १५ ते ५९ वयोगटातील लोकांचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे शहरांमुळे लिंग गुणोत्तरही असमान असते आणि पुरुषांची संख्या ही स्त्रियांच्या संख्येच्या तुलनेत जास्त असते. शहरांमध्ये द्वितीयक, तृतीयक आणि चतुर्थक व्यवसायांचा विकास झालेला असतो. पायाभूत सुविधा, वैद्यकीय सेवा-सुविधा, शैक्षणिक सेवा-सुविधा या ग्रामीण प्रदेशांच्या तुलनेत चांगल्या प्रकारे उपलब्ध असतात. त्यामुळे एकंदरीत राहणीमानही चांगले असते. मात्र, काही प्रदेशात आणि काही शहरात जास्त लोकसंख्येमुळे आणि जास्त लोकसंख्या घनता यांमुळे निवासाच्या समस्या निर्माण होतात. घरांच्या किमती खूप जास्त असतात आणि त्यामुळे झोपडपट्ट्या निर्माण होतात.
थोडक्यात, वास्तव्याच्या ठिकाणावरून लोकसंख्येचे ग्रामीण आणि शहरी असे वितरण अभ्यासले, तर त्यात खूप लक्षणीय फरक दिसून येतात.
३) स्थलांतराचा देशातील लोकसंख्या रचनेवर होणारा परिणाम स्पष्ट करा.
उत्तर :
व्यक्ती किंव समूहाचे एका स्थानाकडून दुसऱ्या स्थानाकडे तात्पुरते किंवा कायम स्वरूपात होणारे स्थानांतरण म्हणजे स्थलांतर होय. खरे म्हणजे एका जागी स्थिर होण्याचा, वस्ती करण्याचा मानवी स्वभाव आहे. त्यातूनच ग्रामीण किंवा शहरी वसाहती उदयास येतात.
मात्र, काही प्रसंगी काही आकर्षण किंवा अपकर्षण करणांमुळे व्यक्ती किंवा समूह स्वेच्छेने किंवा अनिच्छेने एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात जातात आणि स्थलांतराची प्रक्रिया घडून येते.
स्थलांतरास विविध प्राकृतिक, आर्थिक, सामाजिक आणि राजकीय घटक कारणीभूत असतात. मात्र, या कारणांपेक्षाही स्थलांतरामागची प्रेरणा ही जास्त प्रभावी ठरते. आकर्षण आणि अपकर्षण प्रेरणा शेवटी स्थलांतरास प्रत्यक्ष उद्युक्त करतात. रोजगाराच्या संधी, आर्थिक विकास, शहरांचे आकर्षण, उच्च राहणीमान, शिक्षण, वैद्यकीय वाहतुक यांसारख्या सेवा-सुविधा यामुळे जेव्हा व्यक्ती किंवा समूह स्वेच्छेने स्थलांतर करतो, ते स्थलांतर आकर्षण कारणांमुळे घडून येते. याउलट नैसर्गिक आपत्ती, राजकीय सामाजिक संघर्ष, युद्ध किंवा युद्धजन्य परिस्थिती, देशाची किंवा प्रदेशाची फाळणी, अशा परिस्थितीत जी व्यक्ती किंवा समूह स्थलांतरित होण्यास भाग पाडले जातात, तेव्हा त्यास अपकर्षण घटकांमुळे होणारे सक्तीचे स्थलांतर म्हणतात.
कोणत्याही कारणामुळे स्थलांतर झाले, तरी शेवटी त्याचा परिणाम हा स्थलांतरित देणाऱ्या आणि स्थलांतरित घेणाऱ्या अशा दोन्ही प्रदेशांवर आणि देशांवर होतो.
स्थलांतरित देणाऱ्या प्रदेशातील लोकसंख्या कमी होते, लोकसंख्या घनताही कमी होते. स्थानिक पायाभूत सेवा-सुविधा कमी प्रमाणात वापरल्या जातात. अनेक वेळेस स्थानिक पातळीवर कार्यशील लोकसंख्येचे प्रमाण कमी झाल्यामुळे शेती, ग्रामीण उद्योग यांसारख्या व्यवसायांना कार्यशील मजुरांची कमतरता भासते. लिंग गुणोत्तर सकारात्मक होते. याउलट, स्थलांतरित घेणाऱ्या परदेशातील लोकसंख्या नैसर्गिक पद्धतीने वाढते. लोकसंख्येची घनताही वाढते. घरांची मागणी वाढल्यामुळे घरांच्या किमती वाढतात, त्यातून झोपडपट्ट्यांची निर्मिती होते. स्थानिक सेवा-सुविधा, वाहतूक,वैद्यकीय आणि शिक्षणाच्या सेवा-सुविधा यांवर प्रचंड ताण पडतो. आर्थिक आकर्षणे काळाच्या ओघात कमी आकर्षक ठरतात. यामुळे कधीकधी उलट स्थलांतरही घडून येते.
थोडक्यात, स्थलांतरामुळे देणाऱ्या आणि घेणाऱ्या अशा दोन्ही प्रदेशातील लोकसंख्या घनता व रचना, लिंग गुणोत्तर, कार्यशील आणि अवलंबित लोक यांचे प्रमाण अशा विविध घटकांवर परिणाम होतो.