काहीतरी आहे पण काय आहे स्वाध्याय इयत्ता बारावी तत्त्वज्ञान
प्रश्न. १. कंसातील योग्य पर्याय निवडून पुढील विधाने पूर्ण लिहा.
१) ……………….. वस्तूंचा अनुभव वस्तूचे रूप, रांग, आकार, प्रकार इ. या स्वरूपाचा असतो.
(भौतिक, काल्पनिक, तात्त्विक)
उत्तर :
भौतिक वस्तूंचा अनुभव वस्तूचे रूप, रांग, आकार, प्रकार इ. या स्वरूपाचा असतो.
२) अस्तित्वात असणाऱ्या सर्व गोष्टींचे वर्गीकरण ……………… दर्शनाने जीव-अजीव या प्रकारात केले.
(सांख्य, जैन, न्याय)
उत्तर :
अस्तित्वात असणाऱ्या सर्व गोष्टींचे वर्गीकरण जैन दर्शनाने जीव-अजीव या प्रकारात केले.
३) ………………… ज्ञान मिळवण्यासाठी साधने आणि प्रयोग अनिवार्य ठरले.
(व्यक्तिनिष्ठ, आंतरव्यक्तिनिष्ठ, वस्तुनिष्ठ)
उत्तर :
वस्तुनिष्ठ ज्ञान मिळवण्यासाठी साधने आणि प्रयोग अनिवार्य ठरले.
४) फ्लेटोच्या मते, दृश्य जगाचे अस्तित्व …………………. जगावर अवलंबून असते.
(आकारांच्या, प्रतिबिंबांच्या, भौतिक वस्तूंच्या)
उत्तर :
फ्लेटोच्या मते, दृश्य जगाचे अस्तित्व आकारांच्या जगावर अवलंबून असते.
५) देकार्तच्या मते, विश्वात जडद्रव्य आणि चेतनद्रव्य अशी दोन ………………… गुणधर्म असणारी स्वतंत्र द्रव्ये अस्तित्वात आहेत.
(परस्परविरोधी, परस्परावलंबी, परस्परसंबंधी)
उत्तर :
देकार्तच्या मते, विश्वात जडद्रव्य आणि चेतनद्रव्य अशी दोन परस्परविरोधी गुणधर्म असणारी स्वतंत्र द्रव्ये अस्तित्वात आहेत.
प्रश्न. २. गटातील वेगळा शब्द / जोडी ओळखून लिहा.
१) थेलिस, अनाॅक्झिमिनस, हेराक्लिटस, देकार्त
उत्तर :
देकार्त
कारण – थेलिस, अनाॅक्झिमिनिस आणि हेराक्लिटस हे प्राचीन ग्रीक निसर्गवादी (पूर्व-सॉक्रेटिक) तत्त्ववेत्ता असून त्यांनी जगाच्या मूलतत्त्वाचा शोध निसर्गातील घटकांत (जल, वायु, अग्नि) घेतला. देकार्त हा आधुनिक युरोपियन तत्त्ववेत्ता असून त्याने बुद्धिप्रामाण्यवादी पद्धतीने जड व चेतन द्रव्यांची मांडणी केली – म्हणून तो वेगळा ठरतो.
२) जडवाद, वास्तववाद, अस्तकार्यवाद, चिद्वाद
उत्तर :
चिद्वाद
कारण – जडवाद, वास्तववाद आणि अस्तिकार्यवाद हे भौतिक/वस्तुनिष्ठ जगाला अंतिम सत् मानणारे वाद आहेत, तर चिद्वाद हा चैतन्य किंवा मन हेच अंतिम सत् मानतो – म्हणून तो वेगळा आहे.
प्रश्न. ३. पुढील विधाने सत्य की असत्य ते सकारण सांगा.
१) लाईब्निझ हा एकतत्त्ववादी होता.
उत्तर :
असत्य
कारण : लाईब्निझ हा एकतत्त्ववादी नव्हता, तर अनेकतत्त्ववादी होता. त्याने देकार्तचा द्वितत्त्ववाद आणि स्पिनोझाचा एकतत्त्ववाद नाकारून अनेकतत्त्ववादाची मांडणी केली. त्याच्या मते विश्वास्त असंख्य ‘चिदणू’ आहेत आणि सजीव-निर्जीव सर्व गोष्टी या चिदणूंच्या एकत्र येण्याने तयार होतात. त्यामुळे लाईब्निझचा सिद्धांत अनेकतत्त्ववाद व चिद्वाद यांची सांगड घालणारा आहे.
२) पारमेनिडिसच्या मते सत् परिवर्तनशील आहे
उत्तर :
असत्य
कारण : पारमेनिडिसच्या मते ‘सत्’ हे अपरिवर्तनशील आणि शाश्वत आहे. त्याच्या अंतिम सत्मध्ये गती, बदल आणि काल यांना स्थान नाही. त्यामुळे “पारमेनिडिसच्या मते सत् परिवर्तनशील आहे” हे विधान असत्य आहे.
३) चार्वाक जडवादाचे पुरस्कर्ते आहेत.
उत्तर :
सत्य
कारण : चार्वाक हे जडवादाचे पुरस्कर्ते आहेत. त्यांच्या मते विश्वाचे मूळ स्वरूप जड म्हणजे अचेतन व भौतिक आहे आणि याच जडातून चैतन्याची उत्पत्ती होते.
४) शंकराचार्य प्रातिभासिक सत्ला अंतिम सत् मानत नाहीत.
उत्तर :
सत्य
कारण : शंकराचार्यांच्या मते प्रातिभासिक सत् म्हणजे स्वप्नामध्ये येणारा अनुभव होय. जागे झाल्यावर स्वप्नातील जग मिथ्या ठरते. त्यामुळे प्रातिभासिक सत् हे अंतिम सत् नाही. शंकराचार्य अंतिम पातळीवरील सत्ला ‘पारमार्थिक सत्’ असे म्हणतात.
प्रश्न. ४. संकल्पनाचित्र / तक्ता / ओघतक्ता पूर्ण करा.
१)

उत्तर :

२)

उत्तर :

३)

उत्तर :

प्रश्न. ५. पुढील प्रश्नांची २० ते २५ शब्दांमध्ये उत्तरे लिहा.
१) सूक्ष्म कणांमुळे विश्वात कोणती बले उद्भवतात ?
उत्तर :
सूक्ष्म कणांमुळे विश्वात चार प्रकारची बले उद्भवतात. ती म्हणजे गुरुत्वाकर्षण बल, विद्युतचुंबकीय बल आणि दोन केंद्रकीय बले होत. या बलांमुळे सूक्ष्म कणांची हालचाल होते आणि त्यांच्या परस्पर क्रिया घडतात.
२) वैशेषिकांनी किती द्रव्ये सांगितली ? ती कोणती ?
उत्तर :
वैशेषिकांनी विश्वाला आधारभूत अशी एकूण नऊ द्रव्ये सांगितली आहेत. ती म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, दिक्, काल, मनस आणि आत्मा या नऊ द्रव्यांच्या गुणधर्म क्रिया, समानता, वैशिष्ट्ये व परस्परसंबंधांच्या आधारे वैशेषिक दृश्य जगाचे स्पष्टीकरण करतात.
३) हेगेलने सांगितलेली द्वंद्वविकासपद्धती काय आहे ?
उत्तर :
हेगेलच्या मते दोन विरोधी तत्त्वांच्या संघर्षातून तिसरे, अधिक चांगले तत्त्व निर्माण होते. या विकासाच्या प्रक्रियेला द्वंद्वविकास म्हणतात.
४) डेमाॅक्रिटसने सांगितलेली अणूची वैशिष्ट्ये सांगा ?
उत्तर :
डेमॉक्रिटसच्या मते अणू असंख्य, गतिशील, वेगवेगळ्या आकारांचे व लहान-मोठे असतात. त्यांच्या संयोगातून वस्तू निर्माण होतात.
प्रश्न. ६. टीपा लिहा.
१) अभाव
उत्तर :
वैशेषिक दर्शनात ‘अभाव’ म्हणजे अनस्तित्व किंवा एखादी वस्तू नसणे होय. जगाविषयीच्या आपल्या ज्ञानात ‘काय आहे’ याबरोबरच ‘काय नाही’ याचाही समावेश होतो. उदाहरणार्थ, परीक्षेला एखादा मित्र आलेला नसणे किंवा दुकानात हवी असलेली वस्तू उपलब्ध नसणे, हा त्या व्यक्तीचा किंवा वस्तूचा अभाव होय. म्हणून वैशेषिकांनी अस्तित्वाबरोबरच अभावाचीही सविस्तर चर्चा केली आहे.
२) एकतत्त्ववाद
उत्तर :
एकतत्त्ववाद म्हणजे विश्वाच्या मुळाशी एकच अंतिम सत् तत्त्व आहे, असे मानणारा तत्त्वज्ञानाचा सिद्धांत होय. पारमेनिडिस, स्पिनोझा आणि हेगेल यांनी एकतत्त्ववादाचा पुरस्कार केला. स्पिनोझाच्या मते विश्वातील सर्व वस्तू एकाच मूलभूत, अमर्याद, अनादी व अनंत तत्त्वाचे अंश आहेत. त्याने या मूलतत्त्वाला ‘ईश्वर’ किंवा ‘निसर्ग’ असे म्हटले. हे एकच तत्त्व संपूर्ण विश्वात आणि त्यातील प्रत्येक गोष्टीत भरून राहिलेले आहे.
३) हेरॅक्लिटसची सत्ची कल्पना
उत्तर :
हेरॅक्लिटसच्या मते ‘सत्’चे मूळ लक्षण परिवर्तन हे आहे. सत् हे सतत परिवर्तनशील असून विश्व अनित्य स्वरूपाचे आहे. त्याने अग्नीला मूलद्रव्य मानले. अग्नीच्या ज्वालेप्रमाणे विश्वात सतत परिवर्तन घडत असते. त्याच्या मते विरोधी तत्त्वांच्या संघर्षातून व ताणातून विश्वाला काही प्रमाणात स्थैर्य प्राप्त होते. त्यामुळे अनित्यता आणि संघर्षातून येणारे स्थैर्य हे सत्चे महत्त्वाचे गुणधर्म आहेत
४) वैशेषिकांनी सांगितलेले अणूंचे स्वरूप
उत्तर :
वैशेषिकांनी अविभाज्य कणांना ‘परमाणू’ असे म्हटले. त्यांच्या मते पृथ्वी, जल, अग्नी आणि वायू यांच्या परमाणूंच्या संयोगातून सर्व भौतिक वस्तू निर्माण होतात. वस्तूंचा विनाश परमाणूंचे विलगीकरण झाल्यामुळे होतो. परमाणू नित्य, शाश्वत आणि अविनाशी असतात; त्यांचा निर्माण किंवा विनाश होत नाही. मात्र, परमाणूंपासून निर्माण होणाऱ्या वस्तू अनित्य व नाश पावणाऱ्या असतात.
५) हेगेलची ‘केवल’ ही संकल्पना
उत्तर :
हेगेलच्या मते विश्वाच्या मुळाशी एकच सत् तत्त्व आहे. या मूलतत्त्वाला तो ‘केवल’ असे संबोधतो. ‘केवल’ म्हणजे ज्याचे अस्तित्व इतर कशावरही अवलंबून नसते, म्हणजेच निरपेक्षपणे अस्तित्वात असणारे तत्त्व होय. हे ‘केवल’ जड नसून चेतन व बुद्धिरूप आहे. त्यामध्ये अनेक क्षमता व शक्यता सुप्त अवस्थेत असतात. या क्षमतांचे पूर्ण प्रगटीकरण करून स्वतःलाच संपूर्णपणे जाणून घेणे हे ‘केवला’चे साध्य आहे. त्यासाठीच्या विकासातून अवघे विश्व आकाराला येते.
प्रश्न. ७. खालील विधानांचे उदाहरणासहित स्पष्टीकरण करा.
१) एकाच नदीत दोन वेळा पाऊल टाकता येत नाही.
उत्तर :
हेरॅक्लिटसच्या मते सत् हे सतत परिवर्तनशील आहे. विश्वातील प्रत्येक गोष्ट सतत बदलत असते. त्यामुळे एकाच नदीत दोन वेळा पाऊल टाकता येत नाही. कारण पहिल्यांदा नदीत असलेले पाणी वाहून गेलेले असते आणि दुसऱ्यांदा नवीन पाणी आपल्या पायाला स्पर्श करते. नदी तीच असली तरी तिचे स्वरूप सतत बदलत राहते. उदाहरणार्थ, वाहत्या नदीत आपण प्रथम सकाळी पाऊल ठेवले आणि पुन्हा दुपारी त्याच ठिकाणी पाऊल ठेवले, तर तेच पाणी तेथे नसते. यावरून विश्वातील सर्व गोष्टी परिवर्तनशील आहेत, हे स्पष्ट होते.
२) स्वीकारलेली परिभाषा कालबाह्य होणे.
उत्तर :
विज्ञानाच्या प्रगतीमुळे नवीन ज्ञान प्राप्त झाल्यावर पूर्वीची परिभाषा अपुरी किंवा चुकीची ठरू शकते. अशावेळी तिच्याऐवजी नवीन परिभाषा स्वीकारली जाते. यालाच स्वीकारलेली परिभाषा कालबाह्य होणे म्हणतात.
उदाहरण : पूर्वी विज्ञानात ‘इथर’ या संकल्पनेचा वापर केला जात होता; परंतु नंतर नवीन वैज्ञानिक ज्ञानामुळे ही परिभाषा कालबाह्य झाली. तसेच ‘अणू’ आणि ‘कण’ या शब्दांचे अर्थ पूर्वीपेक्षा आता अधिक स्पष्ट व वेगळे झाले आहेत.
प्रश्न. ८. फरक स्पष्ट करा.
१) जडवाद व चैतन्यवाद
उत्तर :
| जडवाद | चैतन्यवाद |
|---|---|
| १. जडवादाच्या मते जड किंवा भौतिक तत्त्व हे मूलभूत आहे. | १. चैतन्यवादाच्या मते चैतन्य हे मूलभूत किंवा प्राथमिक आहे. |
| २. चैतन्याची उत्पत्ती जडापासून होते, असे जडवादी मानतात. | २. जड विश्वाचे अस्तित्व चैतन्यावर अवलंबून किंवा दुय्यम आहे, असे चैतन्यवादी मानतात. |
| ३. जडवादात इंद्रियगोचर भौतिक जगाला वास्तविक मानले जाते. | ३. चैतन्यवादात जड जगाला मूलभूत वास्तव न मानता चैतन्याला अधिष्ठान मानले जाते. |
| ४. चार्वाक हे जडवादाचे प्रमुख पुरस्कर्ते आहेत. | ४. शंकराचार्य यांच्या अद्वैत वेदान्तात चैतन्याला अंतिम सत्य मानले जाते. |
२) द्वितत्त्ववाद व अनेकतत्त्ववाद
उत्तर :
| द्वितत्त्ववाद | अनेकतत्त्ववाद |
|---|---|
| १. द्वितत्त्ववादाच्या मते विश्वाच्या मुळाशी दोन स्वतंत्र मूलभूत तत्त्वे आहेत. | १. अनेकतत्त्ववादाच्या मते विश्वाच्या मुळाशी दोनपेक्षा अधिक मूलभूत तत्त्वे आहेत. |
| २. देकार्तने मन आणि शरीर ही दोन स्वतंत्र द्रव्ये मानली. | २. लाईब्निझने असंख्य ‘चिदणू’ (Monad) ही मूलभूत तत्त्वे मानली. |
| ३. मन हे चैतन्ययुक्त, तर शरीर हे जड स्वरूपाचे आहे. | ३. प्रत्येक चिदणूमध्ये प्राथमिक पातळीवरील जाणीव किंवा चैतन्य असते. |
| ४. त्यामुळे द्वितत्त्ववादात दोन मूलतत्त्वांद्वारे विश्वाचे स्पष्टीकरण केले जाते. | ४. अनेकतत्त्ववादात असंख्य मूलतत्त्वांच्या आधारे विश्वाचे स्पष्टीकरण केले जाते. |
प्रश्न. ९. देकार्तचा द्वितत्त्ववाद आणि स्पिनोझाचा एकतत्त्ववाद यांचे सविस्तर स्पष्टीकरण करा.
उत्तर :
१) देकार्तचा द्वितत्त्ववाद
फ्रेंच तत्त्वज्ञ रेने देकार्त याने द्रव्याची व्याख्या “जे स्वयंभूपणे अस्तित्वात असते ते द्रव्य” अशी केली. त्याच्या मते विश्वात जडद्रव्य आणि चेतनद्रव्य अशी दोन परस्परविरोधी गुणधर्म असणारी स्वतंत्र द्रव्ये आहेत. जडद्रव्याचे प्रमुख लक्षण विस्तार, तर चेतनद्रव्याचे प्रमुख लक्षण चिंतन किंवा चैतन्य आहे. मानवामध्ये ही दोन्ही द्रव्ये परस्पर आंतरक्रियेद्वारे एकत्र नांदतात. मात्र, जड व चेतन द्रव्ये एकमेकांपासून स्वतंत्र असून त्यांचे अस्तित्व परस्परांवर अवलंबून नाही.
देकार्तच्या मते ही दोन्ही द्रव्ये स्वयंभू नसून ईश्वराने त्यांची निर्मिती केली आहे. त्यामुळे त्याने दिलेली द्रव्याची व्याख्या पूर्ण अर्थाने केवळ ईश्वरालाच लागू पडते. म्हणून देकार्तची सत्तामीमांसा द्वितत्त्ववाद आणि वास्तववाद मानणारी आहे.
२) स्पिनोझाचा एकतत्त्ववाद
देकार्तनंतर त्याच बुद्धिवादी परंपरेतील स्पिनोझाने देकार्तचा द्वितत्त्ववाद नाकारून एकतत्त्ववादाची मांडणी केली. त्याने देकार्तच्या द्रव्याच्या व्याख्येचा आधार घेतला. स्पिनोझाच्या मते द्रव्याचे अस्तित्व जर इतर कशावरही अवलंबून नसते, तर त्याचे पूर्ण ज्ञान मिळवण्यासाठी इतर कशाच्या ज्ञानाची आवश्यकता असता कामा नये.
या विचारातून स्पिनोझाने असा निष्कर्ष काढला की जडद्रव्य आणि चेतनद्रव्य ही स्वतंत्र द्रव्ये नसून एकाच मूलभूत द्रव्याची रूपे आहेत. या एकमेव मूलद्रव्याला त्याने ‘ईश्वर’ किंवा ‘निसर्ग’ असे नाव दिले. हे एकच तत्त्व संपूर्ण विश्वात आणि विश्वातील प्रत्येक गोष्टीत भरून राहिलेले आहे. त्यामुळे स्पिनोझाचा सिद्धांत एकतत्त्ववाद असून तो सर्वेश्वरवाद म्हणूनही ओळखला जातो.
थोडक्यात : देकार्तने दोन स्वतंत्र मूलद्रव्ये – जड आणि चेतन मानली, तर स्पिनोझाने एकच मूलद्रव्य – ईश्वर किंवा निसर्ग मानले. त्यामुळे देकार्त द्वितत्त्ववादी, तर स्पिनोझा एकतत्त्ववादी ठरतो.
प्रश्न. १०. सांख्यांचा सत्विषयीचा विचार पूर्णपणे स्पष्ट करा.
उत्तर :
सांख्यांचा सत्विषयीचा विचार
सांख्य दर्शनाने भारतीय परंपरेत द्वितत्त्ववादाची पद्धतशीर मांडणी केली आहे. सांख्य दर्शन वास्तववाद स्वीकारते. त्यांच्या मते विश्वाच्या मुळाशी जडतत्त्व आणि चेतनतत्त्व अशी दोन स्वतंत्र तत्त्वे आहेत. ही दोन्ही तत्त्वे अनादी आणि अनंत आहेत.
१) पुरुष – चेतनतत्त्व
सांख्यांनी चेतनतत्त्वाला ‘पुरुष’ असे म्हटले आहे. चैतन्य हा पुरुषाचा केवळ गुणधर्म नसून त्याचे सारस्वरूप आहे. पुरुष म्हणजे शुद्ध चैतन्य होय. त्यात जडाचा कोणताही अंश नसतो. त्याच्यामध्ये कोणतेही परिवर्तन होत नाही. पुरुष अकर्ता म्हणजे कोणतीही कृती न करणारा आहे आणि त्याचे अस्तित्व भौतिक वस्तूंच्या जगापलीकडे आहे.
२) प्रकृती – जडतत्त्व
सांख्यांच्या मते जडतत्त्वाला ‘प्रकृती’ म्हणतात. बदल, कृतीशीलता, उत्पत्ती आणि विनाश ही प्रकृतीची लक्षणे आहेत. प्रकृतीमध्ये सत्त्व, रज आणि तम हे तीन घटक किंवा गुण असतात. सर्व जड व भौतिक वस्तू प्रकृतीपासून निर्माण होत असल्यामुळे त्यांच्यामध्ये हे तीन गुण कमी-अधिक प्रमाणात असतात.
प्रकृतीच्या मूळ अवस्थेत हे तीनही गुण साम्यावस्थेत असतात. पुरुषाचा प्रकृतीशी संयोग झाल्यावर ही साम्यावस्था बदलते आणि तीन गुणांची घुसळण सुरू होते. त्यातून क्रमाक्रमाने संपूर्ण दृश्य जगाची निर्मिती होते.
३) प्रकृतीपासून विश्वाची निर्मिती
प्रकृतीच्या विकासाचा क्रम सूक्ष्माकडून स्थूलाकडे जातो. या क्रमामध्ये बुद्धी किंवा महत, अहंकार, मनस, ज्ञानेंद्रिये, कर्मेंद्रिये, पाच तन्मात्रा आणि पाच स्थूल घटक म्हणजे पंचमहाभूते निर्माण होतात. अशा प्रकारे प्रकृतीपासून संपूर्ण भौतिक विश्वाची निर्मिती होते.
४) सृष्टीचा प्रलय आणि पुनर्निर्मिती
सांख्यांच्या मते प्रलयाच्या वेळी प्रत्येक घटक आपल्या मूळ रूपात परत जातो आणि संपूर्ण दृश्य जग पुन्हा प्रकृतीमध्ये विलीन होते. त्यानंतर पुन्हा सृष्टीची निर्मिती होते. त्यामुळे उत्पत्ती आणि विनाशाची प्रक्रिया पुन्हा पुन्हा घडत राहते.
प्रश्न. ११. पुढील प्रसंगावर संवाद लिहा.
स्वप्नात अनुभवाला येणाऱ्या गोष्टी खऱ्या असतात असे मानणाऱ्या सहाध्यायीला ‘प्रातिभासिक सत्’ची संकल्पना समजावून सांगणे.
उत्तर :
अमोल : मला काल स्वप्नात माझा मित्र भेटला. आम्ही खूप वेळ बोललो. त्यामुळे स्वप्नात अनुभवलेल्या गोष्टी खऱ्याच असतात, असे मला वाटते.
रोहित : पण स्वप्नातून जागे झाल्यावर त्या गोष्टी खरोखर घडल्या होत्या का?
अमोल : नाही, जागे झाल्यावर समजते की ते फक्त स्वप्न होते.
रोहित : हाच मुद्दा ‘प्रातिभासिक सत्’ या संकल्पनेत स्पष्ट केला आहे. स्वप्नात एखादी गोष्ट आपल्याला त्या वेळी खरी वाटते; परंतु जागे झाल्यानंतर तिचे वास्तव अस्तित्व नाही, हे लक्षात येते.
अमोल : म्हणजे स्वप्नातील अनुभव त्या वेळी खरा वाटतो, पण तो अंतिम सत्य नसतो?
रोहित : अगदी बरोबर! स्वप्नातील वस्तू, व्यक्ती किंवा घटना या प्रातिभासिक सत् मानल्या जातात. त्यांचे अस्तित्व केवळ त्या अनुभवापुरते मर्यादित असते.
अमोल : आता मला समजले. स्वप्नात अनुभवलेल्या गोष्टी खऱ्या वाटल्या तरी त्यांना जागृत अवस्थेतील वास्तवाइतके अंतिम सत्य मानता येत नाही.
रोहित : होय. म्हणून स्वप्नातील अनुभव म्हणजे प्रातिभासिक सत्, तर त्याला अंतिम किंवा शाश्वत सत्य मानता येत नाही.