विंचू चावला स्वाध्याय

विंचू चावला स्वाध्याय इयत्ता बारावी मराठी

१) अ) योग्य पर्याय निवडा व विधान पूर्ण करा.

१) तम घाम अंगासी आला, म्हणजे …..

अ) संपूर्ण शरीराला घाम आला.

आ) घामाने असह्यता आली.

इ) घामामुळे मन अस्थिर झाले.

ई) शीघ्रकोपी वृत्ती वाढीस लागली.

उत्तर :

शीघ्रकोपी वृत्ती वाढीस लागली.

२) मनुष्य इंगळी अति दारुण, म्हणजे ….

अ) माणसातील विकाररूपी इंगळी अतिशय भयंकर असते.

आ) मनुष्याला इंगळी चावणे वाईट.

इ) इंगळी मनुष्याचा दारुण पराभव करते.

ई) मनुष्याला इंगळी नांगा मारते.

उत्तर :

माणसातील विकाररूपी इंगळी अतिशय भयंकर असते.

३) सत्त्व उतारा देऊन, म्हणजे –

अ) जीवनसत्त्व देऊन

आ) सत्त्वगुणांचा आश्रय घेऊन.

इ) सात्त्विक आहार देऊन.

ई) सत्त्वाचे महत्त्व सांगून.

उत्तर :

सत्त्वगुणांचा आश्रय घेऊन.

४) ‘विंचू चावला वृश्चिक चावला’, शब्दांच्या या द्विरुक्तीमुळे –

अ) भारूड उत्तम गाता येते.

आ) वेदनांचा असह्यपणा तीव्रतेने जाणवतो.

इ) भारूडाला अर्थ प्राप्त होतो.

ई) भारूडाला अधिक रंजक बनते.

उत्तर :

वेदनांचा असह्यपणा तीव्रतेने जाणवतो.

आ) कृती करा.

उत्तर :

इ) खालील शब्दांचे अर्थ लिहा.

१) वृश्चिक –

उत्तर :

वृश्चिक – विंचू

२) दाह –

उत्तर :

दाह – आग

३) क्रोध –

उत्तर :

क्रोध – संताप

४) दारुण –

उत्तर :

दारुण – भयंकर

२) खालील ओळींचा अर्थ लिहा.

ह्या विंचवाला उतारा। तमोगुण मागें सारा।

सत्त्वगुण लावा अंगारा। विंचू इंगळी उतरे झरझरां।।

उत्तर :

अर्थ: काम आणि क्रोध या दुर्गुणांना संत एकनाथ महाराजांनी विंचवाची उपमा दिली आहे. हा विंचू जेव्हा मनाला डसतो, तेव्हा त्याची जळजळ शमवण्यासाठी कोणता उपाय करावा, हे या रचनेत सांगितले आहे. मनात साचलेली तामसी वृत्ती आणि दुर्गुण यांचा त्याग करून त्या जागी दयाभाव रुजवावा, असे एकनाथ महाराज सुचवतात. दुर्गुणांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सात्त्विक गुणांची उधळण करावी – जणू अंगाला भस्म चोळावे तसे. असे केल्यास काम-क्रोधरूपी विंचू-इंगळीचे विष उतरून मन लवकर शांत व निर्मळ होते.

३) काव्यसौंदर्य

सत्त्व उतारा देऊन।

अवघा सारिला तमोगुण।

किंचित राहिली फुणफुण।

शांत केली जनार्दनें।। ४।।

वरील ओळींतील भावसौंदर्य स्पष्ट करा.

उत्तर :

संत एकनाथ महाराजांच्या ‘विंचू चावला’ या भारुडात काम-क्रोधरूपी विंचू दंश केल्यानंतर त्यावर नेमका कोणता उपाय अर्थात उतारा करावा, यावर सखोल भाष्य केलेले आढळते.

एकनाथ महाराजांच्या मते, काम-क्रोधरूपी विंचवाचा दंश झाला की मनुष्याचे पंचप्राण अस्वस्थ व तळमळीने व्याकूळ होतात. ही जळजळ शांत करायची असेल तर अंगाला सत्त्वगुणांचा अंगारा लावणे हाच खरा उपाय ठरतो. सत्त्वगुणांच्या याच उताऱ्याच्या साहाय्याने तमोगुणाला मागे सारता येते, आणि त्यायोगे वेदनेची तीव्रता उतरते. तरीही मनात काहीशी कळ, काहीशी ठसठस शिल्लक राहिलीच, तर ती दूर करण्यासाठी सद्गुरू जनार्दन स्वामींच्या कृपाशीर्वादाचा आधार घ्यावा. अशा रीतीने विंचवाच्या विषावरचा अक्सीर उपाय एकनाथ महाराजांनी या रचनेतून उलगडून दाखवला आहे.

तमोगुण आणि सात्त्विक गुण यांच्यातील परस्परसंबंध व त्यांचा परिणाम एकनाथ महाराजांनी या ओळींतून अतिशय जिवंतपणे रेखाटला आहे. यातील हे वेगळेपणाने उभे राहणारे नाट्यरूप उपदेशाची शिकवण लोकमानसावर प्रभावीपणे बिंबवते.

४) रस ग्रहण

खालील ओळींचे रसग्रहण करा.

विंचू चावला वृश्चिक चावला।

कामक्रोध विंचू चावला।

तम घाम अंगासी आला।। धृ.।।

पंचप्राण व्याकुळ झाला।

त्याने माझा प्राण चालिला।

सर्वांगाचा दाह झाला।।१।।

मनुष्य इंगळी अति दारुण।

मज नांगा मारिला तिनें।

सर्वांनी वेदना जाण।

त्या इंगळीची।।२।।

उत्तर :

आशयसौंदर्य : संत एकनाथ महाराजांनी ‘विंचू चावला’ या भारुडाद्वारे मनुष्याने दुर्गुणांवर मात कशी करावी आणि सद्गुणांच्या बळावर काम-क्रोधरूपी विंचवाची जळजळ कशी शमवावी, याचे मोलाचे मार्गदर्शन केले आहे. काम-क्रोधाच्या दंशाने उठणारा दाह कमी करण्याचा प्रभावी उपाय या भारुडातून अत्यंत नाट्यपूर्ण पद्धतीने संत एकनाथ महाराजांनी उलगडून सांगितला आहे.

काव्यसौंदर्य : काम-क्रोधरूपी विंचू जेव्हा डसतो, तेव्हा अंगावर दुर्गुणांचा घाम फुटतो आणि तामसी वृत्ती उसळून वर येते. यामुळे जीव तळमळू लागतो आणि असह्य वेदनांनी हैराण होतो. संपूर्ण देहाला दाहाची झळ बसते, कारण ही मनुष्यरूपी इंगळी अत्यंत भयावह असते; तिचा दंश तीव्र वेदना व यातनांनी भरलेला असतो. वरील ओळींमधील हा भावार्थ लोककथेच्या ढंगात, नाट्यमय शैलीत यथार्थपणे प्रकट होतो.

भाषिक वैशिष्ट्ये : समाजाला नैतिक शिकवण देणारे ‘विंचू चावला’ हे एक अध्यात्मपर रूपक आहे. या भारुडातील भाषेत द्विरुक्तीचा सफाईदार वापर झाल्याने आशयाला अधिक घनता प्राप्त झाली आहे. यातून सामान्य संसारी माणसांना जीवनोपयोगी नीतीबोध मिळतो. सहा विकारांवर सद्गुणांच्या साहाय्याने विजय मिळवा, हा महत्त्वाचा संदेश या भारुडातून दिला जातो. ‘विंचू, वृश्चिक, इंगळी’ असे उत्तरोत्तर तीव्र होत जाणारे शब्द विषाची दाहकता अधोरेखित करतात, तर तमघाम, दाह, दारुण, वेदना यांसारख्या शब्दकळेमुळे दंशाचा वेग व आवेग मनावर ठसतो. एकंदरीत ही भारूड रचना अत्यंत नाट्यपूर्ण असून वाचकाच्या मनाचा ठाव घेणारी ठरते.

५) अभिव्यक्ती

अ) तुमच्यातील दुर्गुणांचा शोध घ्या. हे दुर्गुण कमी करून सद्गुण अंगी बाणवण्यासाठी तुम्ही काय कराल ते लिहा.

उत्तर :

सुरुवातीला माझ्यातील उणिवा मला स्वतःलाच उमगत नव्हत्या; परंतु एके दिवशी माझ्या आईने त्या मोठ्या मायेने माझ्या निदर्शनास आणून दिल्या. माझा पहिला दोष असा होता की, मला पटकन राग यायचा. एखादी गोष्ट माझ्या मनाविरुद्ध घडली की मी चिडून समोरच्या व्यक्तीशी उद्धटपणे बोलत असे. दुसरी उणीव म्हणजे मी जेवण, झोप आणि सकाळी उठणे या सगळ्याच गोष्टी वेळेत करत नसे, त्यामुळे माझी संपूर्ण दिनचर्याच बिघडून जायची.

आईने जेव्हा शांतपणे, समजावणीच्या सुरात हे माझे दोष माझ्या लक्षात आणून दिले, तेव्हा मी त्यावर मनापासून विचार करू लागलो. हे अवगुण दूर करण्यासाठी काहीतरी ठोस पावले उचलायला हवीत, हे मला जाणवले. राग येणे हे मानवी स्वभावाला धरूनच असले, तरी तो अनाठायी असतो हे मी समजून घेतले. कोणत्याही प्रसंगी राग येण्याआधी तो खरोखर योग्य आहे का, याची पडताळणी मी स्वतःशीच करू लागलो आणि माझ्या लक्षात आले की माझ्या तापट स्वभावामुळे घरातल्या माणसांना मनस्ताप होतो. त्यामुळे मी माझ्या रागावर आवर घालायला शिकलो आणि समोरच्याची बाजू समजून घेण्याचा सराव सुरू केला. त्याचबरोबर जेवण-झोप वेळच्या वेळी घेण्याचा मी जाणीवपूर्वक प्रयत्न केला आणि रोज एका ठरावीक वेळीच उठायचे, असा नियम घालून घेतला. सातत्याने केलेल्या प्रयत्नांमुळे मला यातही यश मिळाले आणि पुढे मी आईचा लाडका मुलगा बनलो.

आ) ‘दुर्जनांची संगत इंगळीच्या दंशाइतकी दाहक आहे, त्यावर सत्संग हा सर्व दाह शांत करणारा उपाय आहे’, स्पष्ट करा.

उत्तर :

‘विंचू चावला’ या भारुडात संत एकनाथ महाराजांनी दुर्गुणरूपी विंचवाचा दंश झाल्यावर त्याची जळजळ नेमक्या कोणत्या उपायाने शमवावी, याचा बोध अत्यंत समर्पक प्रतीकांच्या माध्यमातून दिला आहे.

एकनाथ महाराज सांगतात की, काम-क्रोधरूपी विंचू हा अत्यंत भयंकर असतो. एकदा त्याने दंश केला की त्याची दाहकता माणसाचे पंचप्राण अस्वस्थ करून टाकते. येथे काम-क्रोधरूपी विंचू म्हणजे प्रत्यक्षात दुर्गुणांचेच प्रतीक होय आणि हे दुर्गुण मुख्यत्वे दुर्जन माणसांच्या ठिकाणी वास करत असतात. त्यामुळे अशा दुर्जनांची संगत धरणे म्हणजे जणू इंगळीचा दंश स्वतःहून ओढवून घेण्यासारखेच आहे. दुर्जनांची सोबत ही विंचवाच्या दंशाइतकीच त्रासदायक व दाहक ठरते. अशा संगतीत राहिल्यास माणूसही हळूहळू दुर्जन बनत जातो. म्हणूनच यावरचा एकमेव उपाय म्हणजे सद्गुणांचा स्वीकार करणे. यासाठी सज्जनांच्या सहवासात राहणे आवश्यक आहे; सत्संगती नित्य घडायला हवी. असे केल्यासच दुर्गुणांचा दाह शांत होऊ शकतो. सज्जनांच्या संगतीमुळे माणसाच्या अंगी असलेले दुर्गुण नाहीसे होतात आणि दुर्गुणरूपी इंगळीची जळजळ कमी होते. त्यामुळे सत्संग हाच या दाहावरील एकमेव खात्रीशीर उपाय आहे, असे संत एकनाथ महाराज या भारुडातून स्पष्टपणे नमूद करतात.

Leave a Comment