समुद्र कोंडून पडलाय स्वाध्याय इयत्ता बारावी मराठी
१) अ) खालील शब्दसमूहांचा अर्थ स्पष्ट करा.
१) उंचच उंच पण अरुंद बालपण –
उत्तर :
किनाऱ्यावरच्या टोलेजंग इमारतीच्या बत्तिसाव्या मजल्यावरील मुलाला समुद्र हताशपणे पाहतो. त्याच्या मनात विचार येतो की, शहर उंचच उंच इमारतींनी नटलेय; पण त्यांत बालकांचे बालपण मात्र खुजे झालेय. माती त्याच्यापासून दुरावलेली आहे. त्यामुळे त्याचे बालपण निमुळते, टोकदार आणि अरुंद झालेले आहे.
२) डोळ्यांत उतरलेलं थकव्याचं आभाळ –
उत्तर :
समुद्र जेव्हा उत्तुंग इमारतीच्या बत्तिसाव्या मजल्यावर अडकून पडलेल्या एका निरागस बालकाला पाहतो, तेव्हा त्याला बालकाच्या बालपणाची खंत वाटते. त्याचे बालपण खुजे होत चाललेय, याची मनस्वी काळजी वाटते. त्रासून तो हताशपणे बालकाकडे पाहतो नि समुद्राच्या डोळ्यांत आभाळभर थकवा उतरतो.
३) स्टेशनवरल्या बाकाएवढं मुलाचं बालपण –
उत्तर :
महानगरीय जीवनाची झालेली घुसमट पाहून समुद्र संत्रस्त होऊन शहरातून हिंडतो व थकून स्टेशनवरच्या बाकड्यावर बसतो. तेव्हा त्याला शेजारी एक मूल पाय पोटाशी दुमडून झोपलेले आढळते. त्याच्या मनात विचार येतो की, या शहराच्या रहदारीत या बालकाचे बालपण हरवले तर आहेच, पण ते खुंटत चालले आहे. बालपणीचा त्यांचा आनंद आक्रसला आहे. जणू त्याचे बालपण हे स्टेशनवरल्या बाकड्यापुरतेच मर्यादित व बंदिस्त झाले आहे.
आ) कारणे लिहा.
१) कवीला समुद्र संत्रस्त वाटतो, कारण ………………..
उत्तर :
कवीला समुद्र संत्रस्त वाटतो, कारण समुद्र गगनचुंबी इमारतीच्या गजांआड कोंडून पडलाय.
२) समुद्र अस्वस्थ होतो, कारण …………….
उत्तर :
समुद्र अस्वस्थ होतो, कारण तो घुसमटलेल्या शहराच्या आयुष्यांचा चिंताग्रस्त होऊन विचार करतो.
३) समुद्र शिणून जातो, कारण ………………..
उत्तर :
समुद्र शिणून जातो, कारण त्याला शहरातल्या सगळ्यांच्या बालपणाची व वयस्कांची खूप काळजी वाटते.
२) अ) तक्ता पूर्ण करा.
| कवितेचा विषय | कवितेची मध्यवर्ती कल्पना | मनाला भिडणारे शब्दसमूह |
|---|---|---|
उत्तर :
| कवितेचा विषय | कवितेची मध्यवर्ती कल्पना | मनाला भिडणारे शब्दसमूह |
|---|---|---|
| आक्रसून गेलेल्या महानगरीय जीवनाची शोकांतिका | समुद्र हे जीवनाचे प्रतीक आहे. महानगरीय जीवनाची घुसमट आणि माणसांची होत असलेली नगण्य अवस्था पाहून समुद्र चिंताग्रस्त झालेला आहे. | i) समुद्राच्या डोळ्यांत थकव्याचे आभाळ उतरते. ii) मुलाचे बालपण स्टेशनवरल्या बाकाएवढे |
आ) चौकटी पूर्ण करा.

उत्तर :

३) खालील ओळींचा अर्थ लिहा.
समुद्र अस्वस्थ होऊन जातो
शहराच्या आयुष्याच्या विचाराने
तेव्हा तो मनांतल्या मुक्त होऊन फिरूं लागतो
शहरांतल्या रस्त्यांवरून, वस्त्यांमधून
उशिरापर्यंत रात्रीं तो बसलेला असतो
स्टेशनवरल्या बाकावर एकाकी, समोरच्या रुळांवरील रहदारी पाहत,
हातांवर डोकं ठेवून अर्धमिटल्या डोळ्यांनी
उत्तर :
अर्थ : माणुसकी हरवलेल्या शहरी आयुष्याचा विचार करत समुद्राच्या मनात अस्वस्थता दाटून येते. तो विचारांच्या विश्वात मोकळेपणाने भटकत राहतो. शहरातील रस्त्यांवरून उदासपणे फेरफटका मारतो, वस्त्यांमधून चालत जातो आणि शेवटी रात्र बरीच झाल्यावर स्टेशनवरील एका निर्जन बाकावर टेकतो. समोरून जाणाऱ्या गाड्यांची वर्दळ तो शांतपणे न्याहाळत बसतो. हातांचा आधार डोक्याला देऊन, निराश मनःस्थितीत, अर्धवट मिटलेल्या डोळ्यांनी तो या महानगरीय ऱ्हासाचे दृश्य पाहत राहतो.
४) काव्यसौंदर्य
अ) ‘त्याला आठवतं त्याच्याच शेजारीं
पाय मुडपून कसंबसं झोपलेलं एखादं मूल,
ज्याचं बालपण स्टेशनवरल्या बाकाएवढं,
आणि त्याची त्याला कल्पना असावी किंवा नसावी’
या ओळींमधील विचारसौंदर्य स्पष्ट करा.
उत्तर :
कवी वसंत आबाजी दहाके यांनी ‘समुद्र कोंडून पडलाय’ या कवितेत महानगरीय जीवनातील पोकळपणा दाखवण्यासाठी वरील ओळी योजल्या आहेत.
शहरी जगण्यातील घुसमट मांडताना कवींनी समुद्राचे प्रतीक निवडले आहे. समुद्र हे अथांग, विशाल जीवनाचे प्रतिनिधित्व करतो. पण सध्याच्या काळात हेच अफाट जीवन शहरातील उंच इमारतींच्या रेट्यात बंदिस्त होऊन गेले आहे. याच जाणिवेने अस्वस्थ झालेला समुद्र रात्री दमून स्टेशनवरील एकाकी बाकड्यावर निराश मनाने बसतो. त्याच वेळी त्याला त्याच बाकावर शेजारीच एक लहान मूल गुडघे पोटाशी घेऊन झोपलेले दिसते. त्या मुलाच्या पुढील आयुष्याची चिंता समुद्राला सतावू लागते आणि त्याला जाणवते की या मुलाचे बालपणही त्या छोट्याशा बाकड्याइतकेच आक्रसलेले, खुरटलेले आहे. पण त्या निरागस झोपलेल्या जीवाला या कठोर वास्तवाची जाणीव तरी आहे का, असा प्रश्नही समुद्राच्या मनात उमटतो.
येणाऱ्या पिढीचे बालपण महानगरी संस्कृतीच्या झगमगाटात कसे उजाड आणि मर्यादित होत चालले आहे, हा अंतर्मुख करणारा विचार कवींनी अतिशय प्रभावीपणे, काळजाला भिडणाऱ्या शब्दांत व्यक्त केला आहे.
आ) ‘समुद्र खिन्न हसतो आणि शिणलेल्या पापण्या मिटून घेतो.
त्याला काळजी वाटते साऱ्यांच्याच बालपणाची
वयस्कांच्या शहरांतील.’
या ओळींतील भावसौंदर्य स्पष्ट करा.
उत्तर :
महानगरीय दुरवस्था नि घुसमट ‘समुद्र कोंडून पडलाय’ या कवितेत कवी वसंत आबाजी डहाके यांनी भावपूर्ण शब्दांत चित्रित केली आहे. मूल्यहीन शहरी संस्कृतीच्या विचाराने त्रस्त झालेला समुद्र अपरात्री थकून भागून रेल्वे-फलाटावरील एकाकी बाकड्यावर विसावतो. तेव्हा त्याच बाकड्यावर एक मूल पोटाशी पाण्याची मोटकुळी करून झोपलेले त्याला दिसते. बालपण असे संकुचित झालेले पाहून समुद्र विषाद उदास होऊन हसतो. जळजळणाऱ्या डोळ्यांवर दमलेल्या पापण्या मिटून घेतो. वयस्क शहरातील साऱ्या माणसाच्या बालपणाची त्याला घोर चिंता वाटू लागते. उगवत्या पिढीचे भविष्यकालीन खुरटलेले संकेत पाहून तो मनात हळहळत राहतो.
स्टेशनवरच्या या चित्रदर्शी दृश्यातून कवीने समुद्राच्या मनातील विवंचना अचूक व भावपूर्ण शब्दांत रेखाटली आहे. भविष्यकालीन निर्मळ जीवन शहरी संस्कृती मुकणार आहे, तिचा भावनिक ऱ्हास डोळ्यांदेखत पाहतानाची वेदना कवीने मूर्त केली.
५) रसग्रहण.
प्रस्तुत कवितेतील खालील पद्यपंक्तींचे रसग्रहण करा.
समुद्र कोंडून पडलाय गगनचुंबी इमारतींच्या गजांआड.
तो संत्रस्त वाटतो संध्याकाळी : पिंजारलेली दाढी, झिंज्या.
हताशपणे पाहत असतो समोरच्या बत्तिसाव्या मजल्यावरील मुलाकडे,
ज्याचं बालपण उंचच उंच पण अरुंद झालंय
आणि त्याची त्याला कल्पनाच नाही.
समुद्राच्या डोळ्यांत थकव्याचं आभाळ उतरत येतं
आणि शिणून तो वळवतो डोळे.
इमारतींच्या पलीकडच्या रस्त्यावर थकलेल्या माणसांचे पाय, बसचीं चाकं.
उत्तर :
आशयसौंदर्य : कवी वसंत आबाजी डहाके यांनी ‘समुद्र कोंडून पडलाय’ या कवितेत ‘समुद्र’ या प्रतीकातून अमर्याद, अथांग जीवनाचे रूपक साकारले असून, त्याद्वारे महानगरी जीवनातील मूल्यऱ्हास आणि संवेदनाशून्यता तीव्र, बोचऱ्या शब्दांत व्यक्त केली आहे. वरील ओळींमध्ये समुद्राची हतबल, असहाय्य अवस्था प्रकर्षाने अधोरेखित होते.
काव्यसौंदर्य : समुद्रकिनाऱ्यावर उभ्या असलेल्या उत्तुंग, भव्य इमारतींच्या सळयांआड जणू निर्मळ, अथांग जीवनरूपी समुद्रच बंदिस्त झाला आहे. संध्याकाळच्या प्रहरी अत्यंत अस्वस्थ झालेला हा समुद्र, विस्कटलेली दाढी-केस घेऊन हतबल अवस्थेत असताना त्याला एका उत्तुंग इमारतीच्या बत्तिसाव्या मजल्यावर एक लहान मुलगा दिसतो. त्या बालकाचा विचार मनात येताच समुद्राला उमगते की, या मुलाचे बालपण अरुंद, टोकदार आणि खुजे होऊन गेले आहे – मात्र या वास्तवाची जाणीवही त्या निरागस जिवाला नाही. भौतिक विकासाची गगनचुंबी उंची आणि त्याच वेळी संकुचित होत चाललेले बालपण, या दोन्हींमधील तीव्र विसंगती समुद्राच्या नजरेतून सुटत नाही. त्याच्या डोळ्यांत असीम थकवा दाटून येतो, आणि म्हणूनच तो नजर वळवून इमारतींपलीकडील रस्त्यावर रेंगाळत चालणारी माणसे आणि भरधाव धावणाऱ्या बसगाड्यांची चाके न्याहाळतो. तिथेही त्याला गती व अधोगतीचे परस्परविरोधी, विलक्षण चित्र दिसून येते.
भाषिक वैशिष्ट्ये : कवीने या कवितेसाठी मुक्तछंदाची रचना निवडली आहे. मुक्त शैलीतील सहज, विधानात्मक मांडणीतून महानगरी जीवनातील खिन्नता व वैफल्य त्यांनी प्रभावीपणे उभे केले आहे. परिणामी शब्दकळा जणू टोकदार हत्याराने अंतःकरण भेदून जावे, इतक्या थेट व तीव्रतेने वाचकाच्या मनाला स्पर्श करते आणि व्याकूळ करणारा अनुभव देते. समुद्राच्या हालचाली दर्शवणाऱ्या गतिमान क्रियापदांमुळे त्याचा मानसिक प्रवासही वाचकासमोर जिवंत होतो. ‘विस्कटलेले केस-दाढी’ यांसारख्या शब्दयोजनेतून समुद्राचे मानवीकरण साधले जाऊन कविता भावनिक पातळीवर अधिक गडद होत जाते. ‘उत्तुंग परंतु अरुंद बालपण’, ‘डोळ्यांतील थकव्याचे आभाळ’ यांसारख्या परिणामकारक प्रतिमांमधून आशयाला अधिक व्यापक व गहिरे परिमाण प्राप्त होते. महानगरी संवेदनशीलतेचे प्रत्ययकारी दर्शन घडवणारी ही मराठी कविता शहरी संस्कृतीचे वास्तव समर्थपणे उलगडते.
६) अभिव्यक्ती.
अ) ‘समुद्र तुमच्याशी संवाद साधत आहे’, अशी कल्पना करून ते कल्पनाचित्र शब्दबद्ध करा.
उत्तर :
मी समुद्र बोलतो आहे. आज मन मोकळे केल्याशिवाय राहवत नाही, म्हणून माझ्या अंतःकरणातील दुःख तुमच्यासमोर मांडतो आहे. एकेकाळी ‘समुद्र अथांग आहे, असीम आहे’ असे शब्द माझ्या कानी पडत, तेव्हा माझे मन आनंदाने भरून येई. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी परदेशातून मायभूमीच्या ओढीने मला हाक दिली, तेव्हा माझा ऊर अभिमानाने भरून आला होता; कारण भारताच्या स्वातंत्र्याची तळमळ माझ्याही मनात होती. कुसुमाग्रजांनीही ‘कोलंबसाचे गर्वगीत’ या रचनेत मानवी ध्येयनिष्ठेला कोणतीही सीमा, कोणताही किनारा असू शकत नाही, असे ठामपणे सांगितले होते, तेव्हा मलाही मानवाच्या अफाट जिद्दीचा सार्थ अभिमान वाटला होता. पण आजचे हे विदीर्ण, निराशाजनक दृश्य पाहून माझे मन पार खचून जाते!
पूर्वी माझ्या तीरावरून मी दूरवर, अंतापर्यंत पसरलेली विशाल धरती डोळेभरून पाहत असे. ती धरणीमाता माझी सोबतीण होती. तिच्या मिठीत विसावण्यासाठी माझ्या लाटा आतुरतेने, उत्कंठेने किनाऱ्याकडे धाव घेत असत.
पण आज त्याच किनाऱ्यावर माणसाने भव्य, गगनचुंबी इमारतींचे जंगल उभारून ती धरणीमाताच नजरेआड केली आहे. आजचा मनुष्य आकाश गाठण्याच्या नादात जमिनीशी असलेले आपले नाते विसरून गेला आहे. प्रचंड वेगाने भौतिक सुखसोयी मिळवण्याच्या धडपडीत त्याने ममतेचा, आपुलकीचा ओलावा गमावला आहे. ऐहिक सुखाच्या हव्यासापायी त्याने उपभोगवादी संस्कृतीला जन्म दिला असून, प्रगती आणि यशाच्या चुकीच्या कल्पनांच्या आहारी जाऊन तो निसर्गापासून तुटत चालला आहे.
पंचमहाभूतांतील एक घटक असणारा मी, आज तुम्हाला सावध करतो आहे. वेळीच जर तुम्ही जागे झाला नाहीत, तर उद्याचे संकट तुमच्याच डोक्यावर स्वार होईल आणि त्या क्षणी जीव वाचवण्यासाठी तुम्ही माझ्याकडे धावाल – पण तोपर्यंत माझी माया आटून गेलेली असेल !
आ) शहरातील बाल्याची अवस्था कवितेत कशाप्रकारे प्रकट झाली आहे, ते स्पष्ट करा.
उत्तर :
‘समुद्र कोंडून पडलाय’ या कवितेत कवी वसंत आबाजी डहाके यांनी शहरी मुलांचे भेसूर वास्तव अत्यंत हृदयस्पर्शी शब्दांत रेखाटले आहे.
समुद्रकिनाऱ्यावर उभारलेल्या गगनभेदी, उत्तुंग इमारतींच्या सळयांआड समुद्र बंदिस्त झाला आहे. हतबल अवस्थेत तो एका इमारतीच्या बत्तिसाव्या मजल्यावर अडकलेल्या निरागस बालकाकडे हताशपणे पाहत राहतो. त्या मुलाचे बालपण जरी वरकरणी उंच, टोकदार दिसत असले, तरी प्रत्यक्षात ते किती संकुचित व अरुंद होऊन गेले आहे, याची जाणीव समुद्राला होते. मातीतल्या अंगणातील निखळ आनंद त्या मुलाच्या नशिबी नाही, हीच त्याच्या बालपणाची खरी शोकांतिका आहे. याच्या अगदी विरुद्ध, दुसरे एक निरागस मूल स्टेशनवरील एका सुनसान बाकावर गुडघे पोटाशी घेऊन, गोळा होऊन झोपलेले दिसते. एक मूल आकाशाला भिडणाऱ्या इमारतीत, तर दुसरे बेघर होऊन उघड्या जमिनीवर – हा भेदक विरोधाभास मनाला वेदना देणारा आहे. या दोघांचेही भवितव्य अंधःकारमय असल्याची जाणीव समुद्राला, म्हणजेच पर्यायाने निर्मळ, निकोप जीवनालाच होणे, हे अत्यंत क्लेशकारक आहे. या दोन्ही परस्परविरोधी अवस्था पाहत समुद्र हतबल होऊन उभा राहतो. विस्कटलेली दाढी-केस सावरत, अस्वस्थ मनाने तो शहरातील वस्तीवस्तीतून भटकत, सैरभैर फिरत राहतो.
अशा रीतीने शहरी बालपणाची भीषण वास्तविकता कवींनी या कवितेतून प्रभावीपणे साकार केली आहे.
इ) ‘समुद्र कोंडून पडलाय’, या शीर्षकाचा अर्थ तुमच्या शब्दांत उलगडून दाखवा.
उत्तर :
कवितेच्या शीर्षकातूनच कवी वसंत आबाजी डहाके यांनी अत्यंत समर्पकपणे व्यक्त केली आहे.
शहरांमध्ये आज उत्तुंग, भव्य इमारतींचे जणू बंदिस्त तुरुंगच उभे राहिले आहेत. त्यातच बालपण घुसमटून जात आहे. या गगनचुंबी इमारतींच्या सळयांआड समुद्र हतबल होऊन अडकून पडला आहे. मुळात समुद्राचे अस्तित्व हे विशाल, व्यापक व अमर्याद असते; तो सतत उसळता, सजीव आणि गतिमान असतो. मात्र भौतिक सुखांच्या अतिरेकी हव्यासातून जन्मलेल्या महानगरी उपभोगवादी संस्कृतीने या विशाल, चैतन्यमय जीवनालाच कैद करून टाकले आहे. जणू काही जिवंत, चैतन्यदायी पाण्याची समाधी बांधली गेली आहे किंवा अमृतासारख्या पवित्र गोष्टीचे विषात परिवर्तन झाले आहे. समुद्राची ही आंतरिक तडफड, ही भावनिक कुतरओढ कवींनी ‘समुद्र कोंडून पडलाय’ या शीर्षकातून अत्यंत प्रत्ययकारीरीत्या साकारली आहे. त्यामुळे हे शीर्षक कवितेच्या संपूर्ण आशयाला अतिशय सूचक आणि सार्थपणे व्यक्त करणारे ठरते.