रंग माझा वेगळा स्वाध्याय इयत्ता बारावी मराठी
१) अ) खालील अर्थाच्या ओळी कवितेतून शोधा.
| अर्थ | ओळ |
|---|---|
| १) सर्वांमध्ये मिसळूनही मी माझे वेगळेपण जपतो. | ………………… |
| २) मदत करायला येणारे अशाप्रकारे मदत करतात, की त्याचाही मला त्रास होतो. | ………………… |
| ३) हे कोणते अनामिक दु:ख आहे, की ज्याला सदैव माझ्याविषयी प्रेम वाटावे ? | ………………… |
| ४) आयुष्याने माझीच का बरे फसगत केली ? | ………………… |
उत्तर :
| अर्थ | ओळ |
|---|---|
| १) सर्वांमध्ये मिसळूनही मी माझे वेगळेपण जपतो. | रंगुनी रंगांत साऱ्या रंग माझा वेगळा ! गुंतुनी गुंत्यांत साऱ्या पाय माझा मोकळा ! |
| २) मदत करायला येणारे अशाप्रकारे मदत करतात, की त्याचाही मला त्रास होतो. | कोण जाणे कोठुनी ह्या सावल्या आल्या पुढे; मी असा की लागती ह्या सावल्यांच्याही झळा ! |
| ३) हे कोणते अनामिक दु:ख आहे, की ज्याला सदैव माझ्याविषयी प्रेम वाटावे ? | राहती माझ्यासवें हीं आसवें गीतांपरी; हें कशाचें दु:ख ज्याला लागला माझा लळा ! |
| ४) आयुष्याने माझीच का बरे फसगत केली ? | कोणत्या काळीं कळेना मी जगाला लागलों अन् कुठे आयुष्य गेलें कापुनी माझा गळा ! |
आ) कृती करा.

उत्तर :

इ) योग्य जोड्या लावा.
| ‘अ’ गट | ‘ब’ गट |
|---|---|
| १) माणसांची मध्यरात्र | अ) नैराश्यातील आशेचा किरण |
| २) मध्यरात्री हिंडणारा सूर्य | आ) इतरांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची वृत्ती |
| ३) माझा पेटण्याचा सोहळा | इ) माणसांच्या आयुष्यातील नैराश्य |
उत्तर :
| ‘अ’ गट | ‘ब’ गट |
|---|---|
| १) माणसांची मध्यरात्र | इ) माणसांच्या आयुष्यातील नैराश्य |
| २) मध्यरात्री हिंडणारा सूर्य | अ) नैराश्यातील आशेचा किरण |
| ३) माझा पेटण्याचा सोहळा | आ) इतरांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची वृत्ती |
ई) एका शब्दांत उत्तरे लिहा.
| १) कवीची सदैव सोबत करणारी | ………………… |
| २) कवीचा विश्वासघात करणारे | ………………… |
| ३) खोट्या दिशा सांगतात ते | ………………… |
| ४) माणसांच्या अंधकारमय जीवनात साथ देणारा | ………………… |
उत्तर :
| १) कवीची सदैव सोबत करणारी | आसवे |
| २) कवीचा विश्वासघात करणारे | आयुष्य |
| ३) खोट्या दिशा सांगतात ते | तात्पर्य |
| ४) माणसांच्या अंधकारमय जीवनात साथ देणारा | सूर्य |
२) खालील शब्दांचे अर्थ लिहा.
१) तात्पर्थ –
उत्तर :
तात्पर्थ – सार, संसार
२) लळा –
उत्तर :
लळा – प्रेम, माया, ममता
३) गुंता –
उत्तर :
गुंता – गुंतागुंत
४) सोहळा –
उत्तर :
सोहळा – उत्सव, समारंभ
३) खालील ओळींचा अर्थ लिहा.
अ) रंगुनी रंगांत साऱ्या रंग माझा वेगळा !
गुंतुनी गुंत्यांत साऱ्या पाय माझा मोकळा !
उत्तर :
अर्थ : कवी म्हणतात, जीवनाच्या बऱ्यावाईट अशा विविध रंगांत रंगूनही मी माझा वेगळा रंग म्हणजेच माझा वेगळेपणा टिकवून ठेवला आहे. नात्यांच्या, बंधनांच्या सर्व गुंत्यात गुंतलो तरीही मी स्वत: त्यापासून मोकळा राहिलो आहे.
आ) कोणत्या काळीं कळेना मी जगाया लागलों
अन् कुठे आयुष्य गेलें कापुनी माझा गळा !
उत्तर :
अर्थ : कवी म्हणतात, सुखदु:खाच्या विविध प्रसंगांचा सामना करताना मी कधी जीवन जगायला लागलो ते कळलेच नाही. मी आयुष्य जगायला लागलो. पण ह्या आयुष्याने माझा विश्वासघात केला. कायम माझ्या वाट्याला एक अनामिक दु:ख देऊ केले.
४) काव्यसौंदर्य
माणसांच्या मध्यरात्रीं हिंडणारा सूर्य मी :
माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा !
या ओळींमधील भावसौंदर्य स्पष्ट करा.
उत्तर :
सुरेश भट यांच्या ‘रंग माझा वेगळा’ या गझलेतून कवीच्या बंडखोर आणि स्वतंत्र वृत्तीचे दर्शन घडते. कवी स्पष्टपणे सांगतो की, त्याने कोणत्याही चौकटीत स्वतःला अडकवून घेतले नाही. आपले स्वतंत्र आणि निर्भीड विचार त्याने नेहमीच स्पष्टपणे मांडले आहेत. माणुसकीला कलंकित करणारा कोणताही अन्याय त्याने ना स्वतः सहन केला, ना दुसऱ्याला सहन करू दिला. समाजात जरी निराशेचे सावट पसरलेले असले आणि माणुसकीचा अंधःकार गडद झालेला असला, तरीही तो स्वतःला तेजस्वी विचारांचा जळता सूर्य मानतो. दुसऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम तो करतो. स्वतःच्या फायद्यासाठी किंवा स्वार्थासाठी तो कधीच झुरत नाही, किंबहुना स्वतःच्या दुःखाचेही उत्सवीकरण तो करत नाही.
कवीने प्रखर आणि जोशपूर्ण भाषेत आपले स्वयंस्फूर्त विचार व्यक्त केले आहेत. या काव्यपंक्तींमधून समानता आणि स्वातंत्र्य या मूल्यांचा ठाम पुरस्कार दिसून येतो.
५) रसग्रहण.
खालील ओळींचे रंसग्रहण करा.
रंगुनी रंगांत साऱ्या रंग माझा वेगळा !
गुंतुनी गुंत्यांत साऱ्या पाय माझा मोकळा !
कोण जाणे कोठुनी ह्या सावल्या आल्या पुढे;
मी असा की लागती ह्या सावल्यांच्याही झळा !
राहती माझ्यासवें हीं आसवें गीतांपरी;
हें कशाचें दु:ख ज्याला लागला माझा लळा !
कोणत्या काळीं कळेना मी जगाया लागलों
अन् कुठे आयुष्य गेलें कापुनी माझा गळा !
उत्तर :
आशयसौंदर्य : समाजात होणाऱ्या अन्यायाविरुद्ध बंड पुकारणारा एक कलंदर व्यक्ती म्हणजे मी, असा भाव सुरेश भट यांनी ‘रंग माझा वेगळा’ या गझलेत व्यक्त केला आहे. जीवनात अनेकदा फसवणूक झाली असूनही माणुसकीशी असलेली आपली नाळ न तोडणारा, एक सृजनशील मन असणारा मी आहे, असे कवी सांगतो.
काव्यसौंदर्य : या ओळींतून कवीचा असा भाव प्रकट होतो की, अनेक रंगांनी नटलेल्या या जगात माझे रंगरूप निराळे आहे. कोणत्याही गुंतागुंतीत न अडकता मी मोकळेपणाने वावरणारा आहे. माझे व्यक्तिमत्त्व वेगळे व स्वतंत्र आहे. सुखाच्या छाया कोठून व कशा आल्या हे सांगता येत नाही, पण त्या सुखाचाही दाह सोसणारा मी हळव्या मनाचा माणूस आहे. माझे अश्रू हीच माझी साथसंगत असल्याने समाजातील दु:खाशी माझे नाते जुळले. जगण्याचा खरा अर्थ मला उमगला, तरी वाट्याला फसवणूक व विश्वासघातच अधिक आला. तरीदेखील मी सकारात्मक व माणुसकीचा संदेश देत उगवणारा सूर्यासारखा आहे.
भाषिक वैशिष्ट्ये : ही रचना ‘गझल’ या मात्रावृत्तात बांधलेली आहे. संपूर्ण कवितेत अंत्ययमकाचा रदीफ ठळकपणे जाणवतो. ‘मतला’सह एकूण सहा शेर (रेख्ते) यात गुंफले असून, त्यामुळे विषयाची मांडणी सुसंबद्ध व परिणामकारक झाली आहे. ‘सुखाच्या छाया, दु:खाचे नाते, मध्यरात्रीचा सूर्य’ यांसारख्या प्रतिमा ताज्या व वेगळ्या धाटणीच्या आहेत. जोरकस शब्दयोजना व भाषेवरील घट्ट पकड यामुळे ही गझल वाचकांच्या मनाला भिडते.
६) अभिव्यक्ती.
अ) ‘समाजात स्वत:चे वेगळेपण जपण्यासाठी प्रयत्न करावेच लागतात’, सोदाहरण स्पष्ट करा.
उत्तर :
जीवन सार्थकी लावायचे असेल, तर आयुष्यासमोर एक निश्चित ध्येय असणे आवश्यक आहे आणि ते ध्येय निष्ठेने व व्रतस्थपणे साध्य करायचे असेल, तर स्वतःचे वेगळेपण टिकवण्यासाठी अथक परिश्रम करणे तितकेच महत्त्वाचे ठरते.
माणसाने प्रथम स्वतःमधील कर्तृत्वशक्तीची जाणीव करून घेतली पाहिजे, तरच समाजात त्याचे वेगळेपण उठावदारपणे दिसून येते. कर्तृत्व हेच खऱ्या अर्थाने माणूसपणाचे लक्षण आहे. समाजाप्रती असलेली बांधिलकी अंतःकरणापासून असणे गरजेचे आहे. आदरणीय बाबा आमटे यांनी आपला वकिलीचा व्यवसाय बाजूला सारून कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनाचे कार्य स्वतःच्या खांद्यावर पेलले आणि त्यातूनच ‘आनंदवन’ साकारले. त्यांचे हे वेगळेपण समाजात ठळकपणे उठून दिसते.
गाडगे महाराजांनी संसाराचा त्याग करून स्वच्छतेचे व्रत एकहाती चालवले आणि लोकांच्या मनातील विवेकबुद्धी जागृत करण्यासाठी कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधनाचे कार्य केले. गाडगे महाराज आजही एक आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणून आपल्याला पूजनीय वाटतात.
आ) कवीच्या आयुष्याने केलेली त्याची फसवणूक तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
उत्तर :
‘रंग माझा वेगळा’ या गझलेत कवीने आपल्या निर्भीड व स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाचे स्वरूप उलगडत असतानाच, आयुष्यात वाट्याला आलेल्या फसवणुकीचाही धांडोळा घेतला आहे.
कवी सांगतो – मी कोणत्याही गुंतागुंतीत सापडलो नाही, ना कोणत्या एका रंगात मिसळून गेलो; माझे स्वतःचे अस्तित्व मी वेगळेच राखले. सुखाची सावली मला केव्हा लाभली हे मात्र समजलेच नाही; तरीही या क्षणभंगुर सुखाचे चटके मी सहन केले. माझ्या काव्यरचनेला माझ्या अश्रूंचीच सोबत लाभली, आणि त्यामुळेच समाजातील दु:खाशी माझी जवळीक निर्माण झाली.
मला उपदेशाचे डोस पाजणारे अनेक जण भेटले. सत्य परिस्थिती उलटीच भासवणारेही भेटले. नीट चालणाऱ्यालाच ‘पांगळा’ म्हणणारे आणि पाहणाऱ्यालाच ‘आंधळा’ ठरवणारे कपटी लोक माझ्या वाट्याला आले. कोणत्या निर्धास्त क्षणी नियतीने माझा विश्वासघात केला, हे माझे मलाच उमगले नाही; तरीदेखील या फसगतीवर मात करून मी टिकून राहिलो. मी कधीच स्वार्थासाठी जगलो नाही. समाजाचे दु:ख हलके करणारा, निराशेच्या अंधारातही तळपणारा सूर्य मी बनलो.
इ) ‘मी मध्यरात्री हिंडणारा सूर्य आहे’, असे कवी स्वत: बाबत का म्हणतो ते लिहा.
उत्तर :
समाजात पसरलेल्या दुःखा-दैन्याच्या अंधकाराला दूर सारण्याची निर्भीड व दृढ वृत्ती अंगी बाळगणारा मी माणूस आहे, असे स्वतःचे रूप कवीने ‘रंग माझा वेगळा’ या कवितेत रेखाटले आहे. कवी म्हणतो, ‘तात्पर्य’ सांगण्याचा आव आणणारी लबाड माणसे व दुसऱ्यांची फसवणूक करणारी माणसे खोट्या मुखवट्याआडून समाजात वावरत असतात.
हे लोक समाजाला फसवण्याच्या संधीच्या शोधात असतात. त्यामुळेच समाजात निराशेची गडद रात्र दाटून आली आहे. जशी मध्यरात्री सूर्य झाकोळला जाऊन सर्वत्र अंधाराचे राज्य पसरते, तशाच या माणुसकीशून्य काळरात्रीत मी मात्र तेजाने तळपणारा सूर्य आहे. आपल्या प्रखर व सकारात्मक विचारांच्या बळावर मी समाजातील निराशेचा अंधःकार दूर करेन, हाच भाव या शेरातून व्यक्त करताना कवी स्वतःबद्दल ठामपणे म्हणतो – ‘मी मध्यरात्री हिंडणारा सूर्य आहे.’