सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय स्वाध्याय इयत्ता बारावी अर्थशास्त्र
प्रश्न. १. योग्य पर्याय निवडा :
१) अर्थशास्त्राची शाखा, जी संसाधन वाटपाशी संबंधित आहे.
अ. सूक्ष्म अर्थशास्त्र
ब. स्थूल अर्थशास्त्र
क. अर्थमिती
ड. यांपैकी काहीही नाही
पर्याय :
१) अ, ब, क
२) अ, ब
३) फक्त अ
४) वरीलपैकी नाही
उत्तर :
३) फक्त अ
२) सूक्ष्म अर्थशास्त्रातील संकल्पना
अ. राष्ट्रीय उत्पन्न
ब. सामान्य किंमत पातळी
क. घटक किंमत
ड. उत्पादन किंमत
पर्याय :
१) ब, क
२) ब, क, ड
३) अ, ब, क
४) क, ड
उत्तर :
४) क, ड
३) सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषणात वापरली जाणारी पद्धत.
अ. राशी पद्धत
ब. समग्र पद्धत
क. विभाजन पद्धत
ड. सर्वसमावेशक पद्धत
पर्याय :
१) अ, क, ड
२) ब, क, ड
३) फक्त क
४) फक्त अ
उत्तर :
३) फक्त क
४) स्थूल अर्थशास्त्र खालील संकल्पनांचा अभ्यास करते.
अ. संपूर्ण अर्थव्यवस्था
ब. आर्थिक विकास
क. एकूण पुरवठा
ड. उत्पादन किंमत
पर्याय :
१) अ, ब, क
२) ब, क, ड
३) फक्त ड
४) अ, ब, क, ड
उत्तर :
१) अ, ब, क
प्रश्न. २. सहसंबंध पूर्ण करा :
१) सूक्ष्म अर्थशास्त्र : विभाजन पद्धत : : स्थूल अर्थशास्त्र : ………………….
उत्तर :
सूक्ष्म अर्थशास्त्र : विभाजन पद्धत : : स्थूल अर्थशास्त्र : राशी पद्धत
२) सूक्ष्म अर्थशास्त्र : झाड : : स्थूल अर्थशास्त्र : ………………….
उत्तर :
सूक्ष्म अर्थशास्त्र : झाड : : स्थूल अर्थशास्त्र : जंगल
३) स्थूल अर्थशास्त्र : उत्पन्न आणि रोजगार सिद्धान्त : : सूक्ष्म अर्थशास्त्र : ………………….
उत्तर :
स्थूल अर्थशास्त्र : उत्पन्न आणि रोजगार सिद्धान्त : : सूक्ष्म अर्थशास्त्र : किंमत निश्चितीचे सिद्धांत/आर्थिक कल्यानाचे सिद्धांत
४) मॅक्रोम : स्थूल अर्थशास्त्र : : मायक्रोम : ………………….
उत्तर :
मॅक्रोम : स्थूल अर्थशास्त्र : : मायक्रोम : सूक्ष्म अर्थशास्त्र
५) सर्वसाधारण समतोल : स्थूल अर्थशास्त्र : : …………………. : सूक्ष्म अर्थशास्त्र
उत्तर :
सर्वसाधारण समतोल : स्थूल अर्थशास्त्र : : आंशिक समतोल : सूक्ष्म अर्थशास्त्र
प्रश्न. ३. खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा :
१) गौरीने एका विशिष्ट उद्योगातील वैयक्तिक उत्पन्नाची माहिती गोळा केली.
उत्तर :
संकल्पना : वैयक्तिक घटक/वैयक्तिक घटकांचा अभ्यास
स्पष्टीकरण :
i) सूक्ष्म अर्थशास्त्र हे अर्थव्यवस्थेतील छोट्या आणि विशिष्ट घटकांच्या वर्तनाची तपासणी करते – जसे की एखादी विशिष्ट उद्योगसंस्था, एखादे कुटुंब किंवा एखाद्या वस्तूची किंमत. थोडक्यात, संपूर्ण अर्थव्यवस्थेऐवजी त्यातील स्वतंत्र घटकांवर लक्ष केंद्रित केले जाते.
ii) वर दिलेल्या उदाहरणात गौरीने एका ठराविक उद्योगाशी संबंधित वैयक्तिक उत्पन्नाची आकडेवारी संकलित केली आहे. त्यामुळे तिचा हा अभ्यास वैयक्तिक घटकांच्या अभ्यासाचे उदाहरण ठरतो.
२) रमेशने उत्पादनविषयक सर्व निर्णय स्वत: घेण्याचे ठरविले, उदा., काय आणि कसे उत्पादन करावे ?
उत्तर :
संकल्पना : मुक्त बाजार अर्थव्यवस्थेतील व्यावसायिक निर्णय
स्पष्टीकरण :
i) मुक्त बाजार अर्थव्यवस्थेत उत्पादन प्रक्रिया कार्यक्षमपणे चालावी यासाठी उत्पादक अथवा व्यावसायिकाला स्वतःच काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतात. असे स्वयंनिर्णित निर्णयच मुक्त बाजार अर्थव्यवस्थेतील व्यावसायिक निर्णय म्हणून ओळखले जातात.
ii) किंमत निश्चिती, उत्पादनखर्चाचे नियोजन यांसारख्या बाबींवरही व्यावसायिकाला स्वतः निर्णय घ्यावे लागतात. या संपूर्ण प्रक्रियेत शासन किंवा अन्य कोणतीही बाह्य यंत्रणा ढवळाढवळ करत नाही, हे या व्यवस्थेचे वैशिष्ट्य आहे.
३) शबानाने आपल्या कारखान्यातील कामगारांना वेतन आणि बँक कर्जावरील व्याज दिले.
उत्तर :
संकल्पना : उत्पादन घटकांचे मोबदले
स्पष्टीकरण :
कोणत्याही वस्तूच्या निर्मितीसाठी भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक हे चार उत्पादन घटक अनिवार्य असतात. हे घटक उत्पादन प्रक्रियेत आपापले योगदान देतात, आणि त्या बदल्यात उत्पादक त्यांना ठराविक मोबदला अदा करतो – भूमीसाठी खंड, श्रमासाठी वेतन, भांडवलासाठी व्याज आणि संयोजकासाठी नफा अशा स्वरूपात हे मोबदले दिले जातात.
प्रश्न. ४. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा :
१) सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये स्पष्ट करा.
उत्तर :
“अर्थव्यवस्थेचा सूक्ष्म पातळीवरील अभ्यास म्हणजेच सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र होय.”
सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे सांगता येतील :
i) वैयक्तिक घटकांचा अभ्यास : सूक्ष्म अर्थशास्त्रात संपूर्ण अर्थव्यवस्थेऐवजी एखादी विशिष्ट उद्योगसंस्था, कुटुंब, वैयक्तिक किंमत यांसारख्या छोट्या आर्थिक घटकांच्या वर्तनाची तपासणी केली जाते. उदा., वैयक्तिक मागणी, वैयक्तिक उत्पन्न, वैयक्तिक पुरवठा.
ii) विभाजन पद्धती : या शास्त्रात संपूर्ण अर्थव्यवस्थेचे लहान लहान घटकांत विभाजन करून प्रत्येक घटकाचा स्वतंत्रपणे व सखोल अभ्यास केला जातो. उदा., राष्ट्रीय उत्पन्नातील एका व्यक्तीच्या उत्पन्नाचा अभ्यास.
iii) आंशिक समतोल विश्लेषण : सूक्ष्मलक्षी विश्लेषण म्हणजे मुळात आंशिक समतोलाचे विश्लेषण असते. यामध्ये एखाद्या घटकाला उर्वरित अर्थव्यवस्थेपासून वेगळे करून केवळ त्याच्याच समतोलाचा अभ्यास केला जातो. उदा., एकाच उपभोक्त्याचा किंवा एका उद्योगाचा अभ्यास.
iv) किंमत सिद्धांत : वस्तू-सेवांची तसेच उत्पादन घटकांची किंमत कशी ठरते, याचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रात केला जातो. किंमतीच्या अभ्यासावर भर असल्यामुळे याला किंमत सिद्धांत असेही संबोधले जाते.
v) बाजार रचनांचे विश्लेषण : पूर्ण स्पर्धा, मक्तेदारीयुक्त स्पर्धा, मक्तेदारी, अल्पाधिकार अशा विविध प्रकारच्या बाजार संरचनांचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रात केला जातो.
vi) मर्यादित व्याप्ती : तेजी-मंदी, व्यवहारतोल, राष्ट्रीय उत्पन्न, दारिद्र्य, बेरोजगारी, लोकसंख्यावाढ, आर्थिक विकास यांसारख्या संपूर्ण राष्ट्राशी संबंधित मोठ्या समस्यांचा समावेश सूक्ष्म अर्थशास्त्रात होत नाही; त्याची व्याप्ती केवळ वैयक्तिक घटकांपुरतीच मर्यादित असते.
vii) अनेक गृहितकांवर आधारित : ‘इतर सर्व घटक स्थिर आहेत’ या मूलभूत गृहितकाच्या आधारे सूक्ष्म अर्थशास्त्रीय विवेचनाला सुरुवात होते. तसेच पूर्ण रोजगार, शुद्ध भांडवलशाही अर्थव्यवस्था, पूर्ण स्पर्धा, शासनाचे निर्हस्तक्षेप धोरण अशा गृहितकांमुळे सिद्धांताचे स्पष्टीकरण सुलभ बनते.
viii) सीमांत तत्त्वाचा वापर : सूक्ष्म आर्थिक विश्लेषणात सीमांत ही संकल्पना मध्यवर्ती भूमिका बजावते. एका जादा नगामुळे एकूण परिमाणात होणारा बदल म्हणजे सीमांत परिमाण होय. उत्पादक व उपभोक्ते आर्थिक निर्णय घेताना तसेच सूक्ष्म पातळीवरील बदलांचे परिणाम अभ्यासताना या तत्त्वाचा वापर केला जातो.
२) स्थूल अर्थशास्त्राचे महत्त्व स्पष्ट करा.
उत्तर :
“स्थूल अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेच्या संपुर्ण कार्यपद्धतीशी संबंधित आहे.”
स्थूल अर्थशास्त्राचे महत्त्व पुढीलप्रमाणे स्पष्ट करता येते :
i) रोजगाराची सर्वसाधारण पातळी : एकूण रोजगार पातळी आणि उत्पादन यांचे विश्लेषण करण्यासाठी स्थूल अर्थशास्त्र उपयुक्त ठरते.
ii) राष्ट्रीय उत्पन्न : स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासातून राष्ट्रीय उत्पन्न व सामाजिक लेखांकनाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. राष्ट्रीय उत्पन्नाची पुरेशी माहिती असल्याशिवाय कोणतेही नवे आर्थिक धोरण आखणे शक्य होत नाही.
iii) आर्थिक विकास : देशातील दारिद्र्य, उत्पन्न-संपत्तीतील असमानता आणि लोकांच्या राहणीमानातील तफावत यांसारख्या समस्या समजून घेण्यास स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास उपयोगी पडतो, आणि याच आकलनातून आर्थिक विकासाची दिशा निश्चित करता येते.
iv) आर्थिक चढ-उतार : उत्पन्न, उत्पादन व रोजगार यांमध्ये होणाऱ्या चढ-उतारांची कारणे शोधणे तसेच त्यांची तीव्रता कमी करून त्यांवर नियंत्रण मिळवणे यासाठी स्थूल आर्थिक विश्लेषण सहाय्यक ठरते.
v) स्थूल आर्थिक चलांचा अभ्यास : अर्थव्यवस्था कशी कार्य करते हे समजण्यासाठी एकूण उत्पन्न, उत्पादन, रोजगार आणि सर्वसाधारण किंमत पातळी यांसारख्या स्थूल आर्थिक चलांचा अभ्यास आवश्यक असतो, कारण अर्थव्यवस्थेतील मुख्य समस्या याच चलांशी निगडित असतात.
vi) अर्थव्यवस्थेची कामगिरी : संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यासाठी स्थूल अर्थशास्त्र सहाय्यभूत ठरते. दीर्घकालीन कामगिरी मोजण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीचा वापर केला जातो.
vii) अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती : स्थूल आर्थिक विश्लेषणामुळे संपूर्ण आर्थिक व्यवस्था कशी चालते, याची स्पष्ट कल्पना मिळते. गुंतागुंतीच्या व व्यापक अर्थव्यवस्थेतील एकूण आर्थिक चलांचे वर्तन समजून घेण्यास हे विश्लेषण मदत करते.
३) स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती स्पष्ट करा.
उत्तर :
“स्थूल अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेच्या संपुर्ण कार्यपद्धतीशी संबंधित आहे.”
स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती पुढीलप्रमाणे स्पष्ट करता येते :
i) उत्पन्न व रोजगार सिद्धांत : राष्ट्रीय उत्पन्न आणि रोजगार पातळी कशी निर्धारित होते, याचे विश्लेषण स्थूल अर्थशास्त्रात केले जाते. तसेच उत्पन्न, उत्पादन व बेरोजगारीच्या पातळीत होणाऱ्या बदलांची किंवा चढ-उतारांची कारणे यातून उलगडली जातात. रोजगार पातळी नेमकी कशी ठरते हे जाणून घेण्यासाठी उपभोग फलन व गुंतवणूक फलन यांचा अभ्यास करणे आवश्यक ठरते.
ii) सर्वसाधारण किंमत पातळी सिद्धांत : सर्वसाधारण किंमत पातळी कशी निश्चित होते आणि तिच्यातील चढ-उतारांमागील कारणे कोणती, याचे विश्लेषण स्थूल अर्थशास्त्रात केले जाते. तेजी व मंदीमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांमुळेच सर्वसाधारण किंमत पातळीचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो.
iii) आर्थिक वृद्धी आणि विकासाचे सिद्धांत : विकसित तसेच विकसनशील देशांतील आर्थिक वृद्धी व विकासाशी संबंधित सिद्धांतांचा समावेश स्थूल अर्थशास्त्रात होतो. यामध्ये अल्पविकसितता व दारिद्र्य निर्माण होण्यामागील कारणे आणि त्यांची कार्यपद्धती स्पष्ट केली जाते, तसेच वृद्धी व विकासाचा वेग वाढवण्यासाठी आवश्यक धोरणात्मक उपाय सुचवले जातात.
iv) विभाजनाचा समग्रलक्षी सिद्धांत : एकूण राष्ट्रीय उत्पन्नातून खंड, वेतन, व्याज व नफा या घटकांना मिळणाऱ्या सापेक्ष वाट्याशी संबंधित अभ्यास हा स्थूल अर्थशास्त्रातील एक महत्त्वाचा सिद्धांत आहे.
प्रश्न. ५. खालील विधानांशी आपण सहमत किंवा असहमत आहात सकारण स्पष्ट करा.
१) सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती अमर्याद आहे.
उत्तर :
या विधानाशी मी असहमत आहे.
कारण :
i) सूक्ष्म अर्थशास्त्रात संपूर्ण अर्थव्यवस्थेऐवजी विशिष्ट उद्योगसंस्था, कुटुंब किंवा वैयक्तिक किंमत यांसारख्या छोट्या आर्थिक घटकांच्या वर्तनाचा अभ्यास केला जातो.
ii) तेजी-मंदी, राष्ट्रीय उत्पन्न, दारिद्र्य, बेरोजगारी यांसारख्या संपूर्ण राष्ट्राशी संबंधित मोठ्या आर्थिक समस्यांचा समावेश सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याप्तीत होत नाही.
iii) त्यामुळे हे शास्त्र केवळ वैयक्तिक व छोट्या घटकांपुरतेच मर्यादित राहते, आणि म्हणूनच सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती मर्यादित आहे असे मानले जाते.
२) स्थूल अर्थशास्त्रात वैयक्तिक वर्तनाचा अभ्यास केला जातो.
उत्तर :
या विधानाशी मी असहमत आहे.
कारण :
i) स्थूल अर्थशास्त्र हे संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या कार्यपद्धतीशी निगडित आहे.
ii) अर्थशास्त्राची ही अशी शाखा आहे, जिच्यात एकूण रोजगार, एकूण बचत, एकूण गुंतवणूक तसेच राष्ट्रीय उत्पन्न यांसारख्या मोठ्या समग्र राशींचा आणि त्यांच्यातील परस्परसंबंधांचा अभ्यास केला जातो.
iii) त्यामुळे या शास्त्रात समग्र घटकांचा अभ्यास केला जातो, तर याउलट सूक्ष्म अर्थशास्त्रात वैयक्तिक वर्तनाचा अभ्यास केला जातो.
३) स्थूल अर्थशास्त्र हे सूक्ष्म अर्थशास्त्रापेक्षा वेगळे आहे.
उत्तर :
या विधानाशी मी सहमत आहे.
कारण :
i) स्थूल अर्थशास्त्र हे संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या कार्यपद्धतीशी संबंधित असते, तर सूक्ष्म अर्थशास्त्रात एखादी विशिष्ट उद्योगसंस्था, कुटुंब किंवा वैयक्तिक किंमत यांसारख्या छोट्या आर्थिक घटकांच्या वर्तनाचा अभ्यास केला जातो.
ii) स्थूल अर्थशास्त्र समग्र म्हणजेच अर्थव्यवस्थेतील एकूण घटकांचा अभ्यास करते, तर सूक्ष्म अर्थशास्त्र वैयक्तिक पातळीवरील वर्तनाचा अभ्यास करते.
iii) यामुळेच स्थूल अर्थशास्त्राला उत्पन्न व रोजगार सिद्धांत म्हणून ओळखले जाते, तर सूक्ष्म अर्थशास्त्राला किंमत सिद्धांत म्हणून संबोधले जाते.
४) सूक्ष्म अर्थशास्त्रात विभाजन पद्धतीचा वापर केला जातो.
उत्तर :
या विधानाशी मी सहमत आहे.
कारण :
i) सूक्ष्म अर्थशास्त्रात संपूर्ण अर्थव्यवस्थेऐवजी विशिष्ट उद्योगसंस्था, कुटुंब किंवा वैयक्तिक किंमत यांसारख्या छोट्या आर्थिक घटकांच्या वर्तनाचा अभ्यास केला जातो.
ii) या शास्त्रात संपूर्ण अर्थव्यवस्थेचे लहान लहान घटकांत विभाजन करून प्रत्येक घटकाचा स्वतंत्रपणे व सखोल अभ्यास केला जातो.
iii) उदा., राष्ट्रीय उत्पन्नातील एका व्यक्तीच्या उत्पन्नाचा अभ्यास हे शास्त्र करत असल्यामुळे, या विधानाशी मी सहमत आहे.
५) सूक्ष्म अर्थशास्त्र हे उत्पन्न सिद्धान्त म्हणून ओळखले जाते.
उत्तर :
या विधानाशी मी असहमत आहे.
कारण :
i) सूक्ष्म अर्थशास्त्रात संपूर्ण अर्थव्यवस्थेऐवजी एखादी विशिष्ट उद्योगसंस्था, कुटुंब किंवा वैयक्तिक किंमत यांसारख्या छोट्या आर्थिक घटकांच्या वर्तनाचा अभ्यास केला जातो.
ii) वस्तू-सेवांची किंमत तसेच उत्पादन घटकांची किंमत कशी ठरते, याच्याशी सूक्ष्म अर्थशास्त्राचा थेट संबंध आहे.
iii) किंमतींचा अभ्यास हा सूक्ष्म अर्थशास्त्राचा गाभा असल्याने त्याला किंमत सिद्धांत असे संबोधले जाते, तर याउलट स्थूल अर्थशास्त्राला उत्पन्न सिद्धांत म्हटले जाते.
प्रश्न. ६. सविस्तर उत्तरे लिहा :
१) सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व स्पष्ट करा.
उत्तर :
सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व पुढीलप्रमाणे स्पष्ट करता येते :
i) किंमत निर्धारण : विविध वस्तूंच्या किंमती तसेच विविध उत्पादन घटकांच्या किंमती कशा ठरतात, हे समजून घेण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो.
ii) मुक्त बाजार अर्थव्यवस्था : मुक्त बाजार अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती समजून घेण्यास सूक्ष्म अर्थशास्त्र मदत करते. मुक्त अर्थव्यवस्थेत काय, कसे व किती उत्पादन करायचे यांसारखे आर्थिक निर्णय खासगी पातळीवरच घेतले जातात, आणि यात शासनाचा हस्तक्षेप नसतो.
iii) विदेश व्यापार : आयात-निर्यात शुल्काचा एखाद्या विशिष्ट वस्तूवर होणारा परिणाम, दोन देशांतील चलन विनिमय दर कसा ठरतो, तसेच आंतरराष्ट्रीय व्यापारातून मिळणारे फायदे यांसारख्या विदेश व्यापारातील विविध बाबी समजून घेण्यास सूक्ष्म अर्थशास्त्र उपयुक्त ठरते.
iv) आर्थिक प्रारूपांची निर्मिती : गुंतागुंतीच्या आर्थिक परिस्थितीचे आकलन सुलभ प्रारूपांच्या साहाय्याने करून घेण्यास सूक्ष्म अर्थशास्त्र मदत करते. विविध आर्थिक संज्ञा, संकल्पना, परिभाषा आणि नवनवीन विश्लेषण-साधने समजून घेण्याच्या दृष्टीनेही हे शास्त्र महत्त्वाचे आहे.
v) व्यावसायिक निर्णय : उत्पादनखर्चाची निश्चिती, वस्तूंची किंमत ठरवणे, जास्तीत जास्त उत्पादन व नफा मिळवणे यांसारखे निर्णय घेताना व्यावसायिकांना सूक्ष्म आर्थिक सिद्धांताचा मोठा आधार मिळतो.
vi) शासनास उपयुक्त : मुक्त बाजार अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती समजून घेण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्र शासनालाही उपयुक्त ठरते. अशा अर्थव्यवस्थेत उत्पादनासंबंधीचे काय, कसे व किती हे निर्णय खासगी पातळीवर घेतले जातात, हे समजून घेणे शासकीय धोरणनिश्चितीसाठी महत्त्वाचे असते.
vii) कल्याणकारी अर्थशास्त्राचा पाया : उपलब्ध साधनसंपत्तीचा योग्य वापर करून समाजाचे जास्तीत जास्त कल्याण कसे साधता येईल, याचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रात केला जातो. त्यामुळे समाजकल्याणाची दिशा समजून घेण्यासाठी या शास्त्राचा अभ्यास पायाभूत ठरतो.
२) स्थूल अर्थशास्त्राची संकल्पना वैशिष्ट्यांसह स्पष्ट करा.
उत्तर :
“स्थूल अर्थशास्त्र म्हणजे अर्थशास्त्राची ती शाखा, जी एकूण रोजगार, एकूण बचत, एकूण गुंतवणूक व राष्ट्रीय उत्पन्न यांसारख्या मोठ्या समग्र राशींचा आणि त्यांच्यातील परस्परसंबंधांचा अभ्यास करते.”
स्थूल अर्थशास्त्र ही संपूर्ण अर्थव्यवस्थेचे विश्लेषण करणारी शाखा असून, यात राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय उत्पादन, एकूण रोजगार, एकूण उपभोग, एकूण बचत, सर्वसाधारण किंमत पातळी तसेच व्यापारचक्रातील चढ-उतार अशा समग्र घटकांचा समावेश होतो.
स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे :
i) समग्र घटकांचा अभ्यास : स्थूल अर्थशास्त्र वैयक्तिक घटकांऐवजी संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करते. उदा., राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय उत्पादन, राष्ट्रीय रोजगार, सर्वसाधारण किंमत पातळी, व्यापारचक्र इत्यादी.
ii) राशी पद्धती : या पद्धतीत एकाच घटकाऐवजी संपूर्ण अर्थव्यवस्थेचा एकत्रित अभ्यास केला जातो. बोल्डिंग यांच्या मतानुसार, ज्याप्रमाणे जंगल हे अनेक झाडांचा समूह असतो आणि त्या संपूर्ण समूहाचा अभ्यास केला जातो, त्याचप्रमाणे स्थूल अर्थशास्त्रही अर्थव्यवस्थेतील घटकांच्या समूहाचा अभ्यास करते.
iii) सर्वसाधारण समतोल : स्थूल अर्थशास्त्र एकूण घटकांचे वर्तन व त्यांची कार्यपद्धती यांच्याशी संबंधित असते. संपूर्ण अर्थव्यवस्थेतील एकूण मागणी, एकूण पुरवठा आणि किंमत यांच्या परस्परसंबंधातून सर्वसाधारण समतोल साधला जातो.
iv) उत्पन्न सिद्धांत : राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना, तिचे विविध घटक, मापनपद्धती तसेच सामाजिक लेखांकन यांचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रात केला जातो. हा अभ्यास एकूण मागणी व एकूण पुरवठ्याशी निगडित असून, राष्ट्रीय उत्पन्नातील चढ-उतार तसेच व्यापारचक्रातील तेजी-मंदी यांच्या कारणांचाही यात समावेश होतो.
v) परस्परावलंबन : स्थूल विश्लेषणात उत्पन्न, उत्पादन, रोजगार, गुंतवणूक यांसारख्या एकूण आर्थिक चलांमधील परस्परावलंबन विचारात घेतले जाते. उदा., गुंतवणुकीत झालेला बदल उत्पन्न व रोजगार यांसारख्या घटकांवर कशाप्रकारे परिणाम करतो, याचा अभ्यास.
vi) सर्वसाधारण किंमत पातळी : सर्वसाधारण किंमत पातळी कशी निश्चित होते आणि तीत काय बदल घडतात, याचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रात केला जातो. अर्थव्यवस्थेत एका ठराविक काळात उत्पादित झालेल्या सर्व वस्तू व सेवांच्या किमतींची सरासरी म्हणजेच सर्वसाधारण किंमत पातळी होय.
vii) धोरणाभिमुखता : लॉर्ड केन्स यांच्या मते, स्थूल अर्थशास्त्र हे आर्थिक समस्यांवर उपाययोजना सुचवणाऱ्या धोरणांची चर्चा करणारे शास्त्र आहे. उदा., भाववाढ आटोक्यात आणणे, रोजगारनिर्मिती करणे, अर्थव्यवस्थेला मंदीतून बाहेर काढणे इत्यादी.
viii) वृद्धीची प्रारूपे : आर्थिक वृद्धी व आर्थिक विकास यांमध्ये विविध घटकांचा कसा सहभाग असतो, याचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रात केला जातो. आर्थिक वृद्धी व विकासासाठी उपयुक्त ठरणारी प्रारूपे विकसित करण्यातही या शास्त्राची मदत होते. उदा., महालनोबिस वृद्धी प्रारूप.